भारताचे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३१ मार्च रोजी संपते. या कालावधीलाच आपण अकाउंटिंग इयर किंवा फिस्कल इयर, असेदेखील म्हणतो. सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो आणि तो अर्थसंकल्प १ एप्रिलपासून लागू होतो. चालू आर्थिक वर्षाच्या समारोपाची वेळ जवळ येत असताना महत्वाच्या गोष्टींबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये महत्त्वाचे नियम, कायदे बदलत आहेत आणि या गोष्टींची अंतिम मुदत जवळ येत आहे. तेव्हा ३१ मार्चपर्यंत पुढील काही महत्त्वाची कामे तुम्हालासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी लागतील.
१. मोफत आधार कार्ड अपडेट
आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ मार्च आहे. आधार कार्डधारक myAadhaar (https://myaadhaar.uidai.gov.in/) या पोर्टलद्वारे मोफत अपडेट करण्याच्या सेवेचा लाभ घेऊ शकतात. कारण- त्यानंतर १४ मार्चपासून जे ग्राहक आधार कार्डामध्ये बदल किंवा अपडेट करतील. त्यांच्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क प्रत्येक आधार केंद्रावर आणि आधार कार्डच्या सर्व अपडेट्सवरही लागू होईल.
२. पेटीएम पेमेंट्स बँक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट बँकांद्वारे ऑफर केलेल्या सेवांशी संबंधित काही सेवांसाठी मुदत वाढवली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना १४ मार्चच्या अगोदर त्यांचे पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करणे आवश्यक आहे. १५ मार्चनंतर पेटीएम बँक खात्यांमध्ये निधी जमा करणे किंवा क्रेडिट व्यवहार करणे शक्य होणार नाही.
३. फास्टटॅग केवायसी
Paytm फास्टटॅग वापरकर्त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने ‘एक वाहन, एक फास्टटॅग’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत फास्टस्टॅग केवायसी अपडेट न केल्यास तुमचे फास्टस्टॅग खाते निष्क्रिय होऊ शकते. केवायसी अपडेट करण्यासाठी वाहनमालकाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील.
४. कर बचत
२०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षासाठी कर बचत पर्याय निवडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ असणार आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार कर वाचविण्यासाठी योग्य त्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ३१ मार्चनंतर तुम्ही गुंतवणूक केली तरी तुम्हाला या आर्थिक वर्षात आयकरातून सूट मिळणार नाही. नवीन प्रणाली आता २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी डिफॉल्ट आहे.
५. आगाऊ कर पेमेंटचा चौथा हप्ता
२०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी तुमच्या आगाऊ (ॲडव्हान्स) कराचा चौथा व अंतिम हप्ता जमा करण्यासाठीची अंतिम मुदत १५ मार्च आहे. ज्यांचा वार्षिक कर १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना आगाऊ कर भरणे बंधनकारक आहे.
६. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे
२०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) सबमिट करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ आहे.ज्यांनी एक तर त्या आर्थिक वर्षासाठी त्यांचे रिटर्न भरले नाही आहे किंवा सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करण्याची संधी असताना उत्पन्नाचा अहवाल देणे चुकून राहिले असेल, त्या व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत अपडेटेड आयकर रिटर्न (सुधारित आयटीआर) भरायचे आहे.