Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत आणि लोकांमध्ये त्यासाठी प्रचंड उत्साह दिसत आहे. या शुभ कार्यासाठी २२ जानेवारी ही तारीख निवडण्यात आली आहे. १५ ते २२ जानेवारीदरम्यान अयोध्येत येणाऱ्या पर्यटक, भाविक, टुरिस्ट यांच्यासाठी हॉटेल्स, ॲप यांची सोय करण्यात आली आहे आणि ज्या नागरिकांना अयोध्येत जाऊन खास सोहळ्याचा अनुभव घेता येणार नाही त्यांच्यासाठी लाइव्ह दर्शन आणि ऑनलाइन प्रसादसुद्धा पाठविण्यात येणार आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरील एक स्कॅम समोर आले आहे. नागरिकांना मोफत व्हीआयपी प्रवेश आणि मोफत प्रसाद ऑफर यांसारखे काही बनावट मेसेज पाठविले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्यांना श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी मोफत व्हीआयपी पास देण्याचा दावा करणारे संदेश पाठविण्यात येत आहेत. काही एक्स (ट्विटर ) वापरकर्त्यांनी या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न उपस्थित केले होते. हे सर्व संदेश किंवा ऑफर्स बनावट आहेत. असे बनावट संदेश पाठवून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. असे संदेश वापरकर्त्यांना पाठवून, त्यांचा VIP प्रवेश सुरक्षित करण्यासाठी APK फाइल डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात येते. त्यामुळे सुरक्षा तज्ज्ञांना संशय आहे की, या फाइलद्वारे डेटा चोरी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मेसेजमध्ये दिलेली कोणतीही लिंक डाऊनलोड किंवा न उघडणे वापरकर्त्यांसाठी योग्य ठरेल.

हेही वाचा…अयोध्येला जायचंय पण राहायचं कुठे ? चांगली हॉटेल्स अन् पार्किंग कसे मिळेल? ‘या’ ॲपमध्ये असणार A टू Z माहिती…

या बनावट मेसेजमध्ये नेमके आहे तरी काय ?

हा बनावट किंवा फ्रॉड संदेश प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन करतो. ‘ २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला व्हीआयपी (VIP) प्रवेश मिळत आहे. तर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून व्हीआयपी पास डाऊनलोड करा,’ असे या बनावट मेसेजमध्ये लिहिण्यात आलेले असते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सरकार किंवा श्रीराम मंदिर ट्रस्ट ॲप्स किंवा लिंक डाऊनलोड करण्यास सांगून व्हीआयपी (VIP) आमंत्रणे जारी करीत नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना स्थानिक हॉटेल्समधील काही बनावट बुकिंग रद्द करण्याच्या दिशेने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अयोध्या राम मंदिराचा प्रसाद भक्तांना ऑनलाइन दिला जाणार दिला जाणार ही बातमी काही दिवसांपूर्वी सांगण्यात आली. हे समजताच काही स्कॅमरनी बनावट वेबसाइट्स बनवण्यास सुरुवात केली आणि काही ग्राहकांना प्रसाद देण्यासाठी शिपिंग शुल्कदेखील भरण्यास सांगितले. पण, सरकारकडून कायदेशीर संदेश मिळाल्याशिवाय अशा गोष्टींवर पैसे खर्च न करणेच समजदारीचे ठरेल. संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी, वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगावी आणि विश्वसनीय वेबसाइट्सशी संवाद साधावा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before ayodhya ram mandir inauguration fake message circulating with free vip entry or free prasad offers asp
Show comments