Laptops Import Restricted In India: केंद्र सरकारने गुरुवारी भारतात लॅपटॉप, टॅब्लेट आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीवर तात्काळ निर्बंध घालण्यात येणार असल्याची घोषणा केली. या अचानक आलेल्या निर्णयामुळे भारतात मॅकबुक्स, मॅक मिनी, Lenovo, HP, Asus, Acer, Samsung व अन्य कंपन्यांना भारतात या उपकरणाची आयात ताबडतोब थांबवावी लागली आहे.
भारतात विकले जाणारे बहुतांश लॅपटॉप आणि पर्सनल कॉम्प्युटर हे चीनमध्ये तयार केले जातात किंवा असेंबल केले जातात आणि या नवीन नियमामुळे सरकार यापैकी काहींचे उत्पादन आणि असेंबलिंग भारतात सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यापूर्वी अशा नियमांमुळे स्मार्टफोन उत्पादनात देशाने जे यश साध्य केले, त्याचप्रमाणे आता लॅपटॉपसाठी आयात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान संबंधित कंपन्यांनी भारतात लॅपटॉप आणण्यासाठी विशेष परवानगी घेईपर्यंत किंवा भारतात उत्पादन सुरु करण्याचा निर्णय होईपर्यंत आयात निर्बंधामुळे भारतात लॅपटॉप, संगणक, मॅकबुक आणि मॅक मिनीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अल्पावधीत आयात निर्बंधामुळे बाजारपेठेत टंचाई निर्माण होणे साहजिक आहे. त्यामुळे साधी आकडेमोड पाहिल्यास मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किमतीत वाढ होऊ शकते.
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, “एकूण लॅपटॉप/पीसी बाजारात दरवर्षी ८ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होतो तसेच सुमारे ६५ टक्के युनिट्स आयात केले जात आहेत. स्मार्टफोन आणि टीव्हीच्या बाबत भारताने जवळजवळ 100% स्थानिक उत्पादन साध्य करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. परंतु IT व हार्डवेअर विभाग मागे पडला आहे, सध्या केवळ ३०- ३५% उत्पादने भारतात तयार केली जात आहेत. या निर्णयामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी मदत होऊ शकेल.
ऍपल आणि लेनोवो सारख्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या लॅपटॉपच्या किमती बदलल्या नाहीत तरीही, आयात निर्बंधामुळे किरकोळ विक्रेते आणि कंपन्या वेळोवेळी ऑफर करत असलेल्या विक्री आणि सवलतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने, किरकोळ विक्रेत्यांना लॅपटॉपवर सूट-सवलत देण्यास जागा उरण्याची शक्यता कमी आहे.
हे ही वाचा<< मोठी बातमी! भारतात लॅपटॉप, टॅबलेट व पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीवर आता निर्बंध, केंद्र सरकारची घोषणा
लॅपटॉपच्या आयातीवरील निर्बंधाचा परिणाम येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तर, दुसरीकडे या निर्णयामुळे रिलायन्स सारख्या कंपन्यांनाही मदत होऊ शकते, काहीच दिवसांपूर्वी JioBook लाँच झाला आहे. हा पर्याय निर्बंधित लॅपटॉप व उपकरणांऐवजी उत्तम उपाय ठरू शकतो.