आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. सर्वात पुढे राहण्यासाठी या कंपन्या अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. OpenAI नंतर लगेचच Google, Meta, Amazon यांनी AI तंत्र विकसित करण्यावर भर देत असल्याची माहिती समोर येत आहे. या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये चुरस लागली आहे. यावरुन AI मुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकतंच एका कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी AI Tech शी संबंधित भविष्यवाणी केली आहे.
Goldman Sachs आणि SV Angel यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बिल गेट्स यांनी “AI च्या उदयाचा प्रभाव ई-कॉमर्स व्यवसायांवर पडणार आहे. जो कोणी ही स्पर्धा जिंकेल, त्याला खूप फायदा होईल. कारण लोक भविष्यात कोणतीही गोष्ट साइटवर शोधणार नाहीत. ते शॉपिंगसाठी Amazon वर जाणार नाहीत”, असे म्हटले होते.. ते पुढे म्हणाले, AI मुळे ग्राहकांच्या वर्तनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. टॉप आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंट्समुळे लवकरच सर्च इंजिन, प्रोडक्टिव्हिटी आणि ऑनलाइन शॉपिंग साईट्ससमोर आव्हान निर्माण होणार आहे. काही दिवसांमध्ये लोक सर्च करण्यासाठी सर्च साइटवर जाणार नाहीत. ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी त्यांना अॅमेझॉनसारख्या वेबसाइट्सची गरज भासणार नाही. एक नवीन डिजिटल एजंट मुख्य प्रवाहात येण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो.
विशेष म्हणजे, पर्सनल असिस्टंट म्हणून हे तंत्र गेट्स यांनी यापूर्वीही वापरले आहे. मार्चमध्ये त्यांनी AI चुकीच्या लोकांपर्यंत पोहचण्याबाबत भीती व्यक्त केली होती. गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याबाबत लिहिले होते. त्यांनी हे तंत्र धावत्या ट्रेनसारखे असू शकते असे म्हटले होते. शिवाय त्यांनी जगातील असमानता नष्ट करण्यासाठी AIची किती मदत होईल हे देखील स्पष्ट केले होते. हे तंत्र पर्सनल असिस्टंट म्हणून कसे असेल; आरोग्य सेवा, शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्यासाठी याची कशी मदत होईल याविषयीचे विचार गेट्स यांनी मांडले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शोध संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेट सारखा क्रांतिकारी शोध आहे.