Canara Bank’s X Account Hacked: सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अ‍ॅपवरून म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) युजर्सचे मोबाइल क्रमांक व नावाच्या आधारे त्यांचे अकाउंट (खाते) शोधून ते हॅक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली कॅनरा बँकसुद्धा या गोष्टीची शिकार झाली आहे. नेमकं काय घडलं आहे सविस्तर जाणून घेऊ.

कॅनरा बँकेचे अधिकृत सोशल मीडियावरील एक्स (ट्विटर) अकाउंट हॅक करण्यात आले आहे. कंपनीने ही माहिती काल रविवारी २३ जूनला दिली आहे. कंपनीने सांगितले की, हॅकरने बँकेच्या अधिकृत अकाउंट @CanaraBank_X चे नाव बदलून ‘ether.fi’ सुद्धा केलं आहे. म्हणजेच बँकेचे अधिकृत हँडल हॅक करून, त्याचे नाव बदलून हॅकरने छेडछाड केली आहे.

हेही वाचा…गूगलकडून एक कॉल आला अन्… अमेरिकन उद्योगपती मार्क क्यूबनचे जीमेल अकाउंट झाले हॅक; नेमकं घडलं तरी काय?

अकाउंट हॅक झाल्याप्रकरणी कॅनरा बँकेची संबंधित टीम याचा तपास करत आहे. त्यांचे अकाउंट पुन्हा रिकव्हर होण्यासाठी कॅनरा बँक एक्स (ट्विटर) सह काम करते आहे ; अकाउंट रिकव्हर झाल्यानंतर युजर्स आणि ग्राहकांना कळवले जाईल. यादरम्यान कॅनरा बँकेच्या ग्राहकांना आणि वापरकर्त्यांना बँकेच्या अधिकृत @CanaraBank_X अकाउंटवर काहीही पोस्ट करू नये असा सल्ला दिला आहे आणि झालेल्या गैरसोयीबद्दल कॅनरा बँकेने दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे. कॅनरा बँकेच्या अधिकृत अकाउंटचे फॉलोअर्स जवळजवळ २.५५ लाख आहेत. रविवारी २३ जून रोजी सुमारे ४ वाजेपर्यंत, खाते हॅक झाल्यानंतर कोणतीही नवीन पोस्ट करण्यात आलेली नाही.

ॲक्सिस बँकेचेसुद्धा झाले होते अकाउंट हॅक

अशाच एका सायबर हल्ल्यात, १७ जून रोजी ॲक्सिस बँकेचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) हँडल हॅक करण्यात आले होते. तेव्हा हॅकर्सनी टेक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीबाबत काही पोस्ट केल्या होत्या. यादरम्यान ॲक्सिस बँकेने प्रतिसाद दिला होता की, “आम्ही बँकेच्या हॅक झालेल्या अकाउंटची चौकशी करत आहोत. आम्ही लवकरात लवकर समस्येचे निराकरण करू. कृपया या कालावधीत केलेल्या सर्व पोस्टकडे दुर्लक्ष करा आणि कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका.’ तसेच “बँकेने कधीही इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन किंवा इतर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती युजर्स किंवा ग्राहकांकडे मागितली नाही याची नोंद घ्यावी’; अशी पोस्ट शेअर केली होती. तर आज कॅनरा बँकेचे अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंट हॅक झाले आहे.