Airtel कंपनी ही भारतामधील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने भारतातील काही शहरात ५जी सर्व्हिस देखील सुरु केली आहे. एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी दरवेळी काही ना काही नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. मात्र काही दिवसांपूर्वीच एअरटेलने त्यांचा मिनिमम रिचार्ज प्लॅन जो ९९ रुपयांचा होता तो बंद केला आहे. तसेच कंपनीच्या बेस प्लॅनची किंमत त्यांनी १५५ रुपये इतकी केली आहे. मात्र पुन्हा एकदा एअरटेल कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.
भारती एअरटेल यावर्षी आपल्या सर्व प्लॅन्समध्ये मोबाईल सर्व्हिसचे दर वाढवण्याचा विचार करत आहे. याबद्दलची माहितीत MWC २०२३ मध्ये टेलिकॉम कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी दिली आहे. म्हणजेच आगामी काळामध्ये एअरटेल वापरकर्त्यांसाठी मोबाईल सर्व्हिस सध्याच्या तुलनेत महागणार आहे.
एअरटेलने गेल्या महिन्यात आपल्या मिनिमम रिचार्जच्या सरावात कमी किंमतीच्या प्लॅनची (२८ दिवसांच्या ) किंमत जवळपास ५७ टक्क्यांनी वाढवून १५५ रुपये केली होती. आठ सर्कलमध्ये ही वाढ करण्यात आली होती. पीटीआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना भारती मित्तल म्हणाले की, दूरसंचार व्यवसायातील कॅपिटलवरील परतावा खूपच कमी आहे. या वर्षी या योजना महाग होण्याची शक्यता आहे.त्यांना त्यांच्या कंपनी चांगल्या स्थितीमध्ये असताना किती दर वाढवण्याची गरज आहे असे त्यांना विचारले असता ही दरवाढ सर्वत्र असेल असे मित्तल यांनी mwc २०२३ मध्ये सांगितले.
एअरटेल कंपनीने भरपूर भांडवल गुंतवले असल्याचे त्यांनी सांगितले. बिझनेसमधील परतावा खूपच कमी आहे. हे बदलण्याची गरज आहे. आम्ही किंमती थोड्या वाढवण्याबद्दल बोलत आहोत जे भारतात आवश्यक आहे. मला आशा आहे की ते यावर्षी होईल असे मित्तल म्हणाले.या दरवाढीमुळे कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गावर याचा काय परिणाम होईल असे मित्तल याना विचारले असता ते म्हणाले की, मोबाईलच्या दरामध्ये वाढ ही इतर गोष्टींवरील खर्चाच्या वाढीपेक्षा खूपच कमी आहे.