भारताने पाठवलेलं चांद्रयान ३ हे चंद्रावर गेल्या काही दिवसांपासून संशोधन करत होतं. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ मिळत होते. परंतु, आता चंद्रावर रात्र झाली आहे. पुढचे १४ दिवस चंद्रावर गडद अंधार असणार आहे. त्यामुळे भारताचं यान आता निष्क्रिय झालं आहे. कारण यान आणि त्याबरोबर पाठवलेली सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवर चालतात. आता तिथे अंधार असल्यामुळे ही सर्व उपकरणं निष्क्रिय करण्यात आली आहेत. म्हणजेच, ही सर्व उपकरणं आता स्लीप मोडमध्ये गेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रोने काल रात्री प्रज्ञान रोव्हरला झोपवलं (स्लीप मोड अ‍ॅक्टिव्हेट केला). त्यापाठोपाठ आज सकाळी ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) विक्रम लँडर झोपी गेला. विक्रमने निद्रावस्थेत जाण्यापूर्वी आधी त्याची जागा बदलली. त्यासाठी या अवकाशयानाने एक मोठी उडी घेतली.

विक्रम लँडरला स्लीपिंग कमांड देण्याआधी नवीन जागेवर सर्व पेलोड्सची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व पेलोड्स बंद करण्यात आले. आता केवळ रिसीव्हर सुरू आहे. जेणेकरून इस्रोच्या बंगळुरूतील कार्यालयातून अवकाशयानाला कमांड देता येईल. सूर्यावर दिवस उजाडल्यानंतर पुन्हा एकदा कमांड देऊन अवकाशयान सुरू केलं जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा, विक्रम आणि प्रज्ञान चंद्रावर संशोधन करू लागतील.

विक्रम लँडरची बॅटरी जशी हळूहळू कमी होत जाईल, तसा तो पूर्णपणे निद्रावस्थेत जाईल. इस्रोला आता आशा आहे की, २२ सप्टेंबर २०२३ रोजी पुन्हा एकदा विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह होईल. तेव्हा चंद्रावर दिवस उजाडलेला असेल.

दरम्यान, विक्रम लँडरने उडी मारल्यानंतरचा एक फोटोही त्याने इस्रोला पाठवला आहे. इस्रोकडून विक्रमने उडी मारण्याआधीचा आणि उडी मारल्यानंतरचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. स्लीप कमांड देण्यापूर्वी ChaSTE, रंभा-एलपी, आणि आयएलएसए पेलोड्सने नवीन ठिकाणी इन-सीटू प्रयोग केले. त्या जागेवर मिळवलेला डेटा इस्रोच्या बंगळुरूतील कार्यालयाला पाठवला आहे.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 नंतर पुढची चांद्र मोहीम कोणती? ISRO ने Vikram Lander वर ‘हा’ प्रयोग करत दिले संकेत…

दरम्यान, प्रज्ञान रोव्हर अशा ठिकाणी उभा केला आहे की चंद्रावर सूर्य उगवल्यावर त्यावरील सोलार पॅनल लगेच अ‍ॅक्टिव्ह होतील. सौरऊर्जा मिळू लागल्यानंतर तो पुन्हा एकदा चंद्रावर संशोधन करू शकेल. त्यामुळे आता इस्रोला चंद्रावर सूर्य उगवण्याची प्रतीक्षा आहे. इस्रोच्या मते २२ सप्टेंबर रोजी विक्रम आणि प्रज्ञान अ‍ॅक्टिव्ह होतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 after pragyan rover vikram lander set into sleep mode payloads switched off by isro asc
Show comments