Chandrayaan 3 Lander Click: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) शनिवारी चंद्रयान-2 च्या ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) ने घेतलेल्या चांद्रयान-3 च्या लँडरच्या फोटो शेअर केले आहेत. मागील आठवड्यात विक्रम लॅण्डर व प्रज्ञान रोव्हर दोन्ही निष्क्रिय करण्यात आले होते, चंद्रावर सध्या गडद अंधार असल्याने चांद्रयान मोहिमेतील या दोन शिलेदारांचा स्लीप मोड ऍक्टिव्हेट करण्यात आला होता. अशात आता विक्रम लॅण्डरची नेमकी स्थिती काय आहे याचा अंदाज देणारे फोटो चांद्रयान २ च्या ऑर्बिटमधील महत्त्वाच्या साधनाने टिपले आहेत.
DFSAR हे चांद्रयान-2 ऑर्बिटरवरील प्रमुख वैज्ञानिक साधन आहे. DFSAR L आणि S बँड फ्रिक्वेन्सीमध्ये मायक्रोवेव्ह प्रसारित व प्राप्त होते. कोणत्याही सोलर इल्युमिनेशनशिवाय हे साधन कार्य करते. हे साधन गेल्या 4 वर्षांपासून चंद्राच्या पृष्ठभागाची इमेजिंग करून उच्च-गुणवत्तेचा डेटा तयार करत आहे. या साधनामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर काही मीटरपर्यंत प्रवेश करण्याची क्षमता आहे.
इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर चांद्रयान ३ च्या लॅण्डरचे फोटो शेअर करत अपडेट दिला आहे. इस्रोने लिहिले की, “६ सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 ऑर्बिटरमधील साधनाने विक्रम लॅण्डरचा फोटो क्लिक केला होता.”
दरम्यान, यापूर्वी इस्रोने प्रज्ञान रोव्हरच्या टॉप नेव्हिगेशन कॅमेर्याने टिपलेले चंद्रावरील विक्रम लॅण्डरचे फोटो शेअर केले होते. यापूर्वी, इस्रोने माहिती दिली होती की विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. याआधी शनिवारी प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर सेट करण्यात आले होते. तर गुरुवार, ७ सप्टेंबरला देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने इस्रोला पहिला सेल्फी पाठवला होता. यात पृथ्वी व चंद्राचे मनोहर दृश्य सुद्धा पाहायला मिळत होते.