ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing Updates: भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केलं. रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली. अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता त्यानुसार ही मोहीम यशस्वी झाली आहे. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. या चांद्रयान मोहिमेबाबतच्या प्रत्येक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून–
Telecast of Chandrayaan-3 Moon Landing, 23 August 2023 | "१४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण", चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मोदींचे उद्गार
चंद्रयान-३ च्या ' विक्रम 'चे चंद्रावर यशस्वी अवतरण होताच सोलापुरात उत्साहाचे वातावरण संचारले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. शालेय विद्यार्थ्यांनीही शाळांच्या आवारात ढोलताशे वाजवत आनंदोत्सव साजरा केला. चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी सकाळी विविध मंदिरांमध्ये संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी साकडे घातले होते. त्यानंतर सायंकाळी चांद्रयान-३ विक्रमचे यशस्वी अवतरण झाल्याची आनंदाची वार्ता कानी पडताच सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाजप शहर कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबजी करण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले. ठिकठिकाणी रस्त्यांवर फाटाके फोडून जल्लोष केला जात होता.
सरस्वती चौकाजवळील सेवासदन कन्या प्रशालेत मुलींनी चांद्रयान मोहिमेच्या यशस्वितेबद्दल जल्लोष केला. जिल्हा परिषदेतही तेथील अधिकारी व कर्मचा-यांनी जल्लोष करण्यासाठी एकत्र आले होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, स्मिता पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज आदींचा त्यात सहभाग होता. सिध्देश्वर पेठेत ब्रह्मदेव माने सहकारी बँकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना मिठाई वाटण्यात आली.
चांद्रयान-३ मोहीमेचे थेट प्रक्षेपणाचा क्षण सर्वसामान्यांसह पनवेल पालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना सामुहिक पद्धतीने पाहता आला. पालिका आयुक्तांसह सर्वांनीच चांद्रयान-३ स्पेसक्राफ्ट चांद्रभूमीला स्पर्श होताच एकच टाळ्यांचा कडकडाट करुन आनंद व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा ऐतिहासिक क्षण पाहता यावा यासाठी पनवेल शहरातील वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी आयोजित करण्याचे आदेश पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते.यावेळी पालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोतल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरताच सांगलीत फटाक्याची आताषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इस्रोच्या चांद्रयान -३ मोहिमेत आज सायंकाळी अखेरचा व महत्वाचा टप्पा होता. हा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमासह दूरचित्रवाणीवर पाहत होते. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच तरुणांनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आताषबाजी करीत भारत माता की जयच्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत झल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी पेढे व साखर वाटप केलं
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशभरात सेलिब्रेशन सुरु झालं आहे. अनेक सेलिब्रिटी ट्वीट करुन इस्रोला शुभेच्छा देत आहेत. मुंबई पोलिसांनी एक खास ट्वीट करुन इस्रोचं कौतुक केलं आहे. यामध्ये चंद्राच्या प्रतिमा दाखवण्यात आल्या आहेत आणि सर्वात शेवटी तिरंगा दाखवण्यात आला आहे.
भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होतं. असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच सगळ्या वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं.
भारताच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा पाहण्यास मिळतो आहे. कारण भारताचं चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरलं आहे. भारताचा झेंडा आता तिथे पाहण्यास मिळतो आहे. इस्रोला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
दक्षिण अफ्रिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स संमेलनासाठी दक्षिण अफ्रिकेत आहेत. त्यांनी तिथून इस्रोच्या या मोहिमेत व्हर्चुअली उपस्थिती लावली आहे. भारत लवकरच इतिहास रचणार आहे. त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ते या मोहिमेत व्हर्चुअली सहभागी झाले आहेत.
वॉशिंग्टन या ठिकाणी भारतीय नागरिक आले आहेत. चांद्रयान मोहिमेचं थेट प्रक्षेपण ते पाहात आहेत. ANI ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
चांद्रयान आता चंद्रपासून २१ किमी अंतरावर आहे. पुढच्या काही वेळातच दीड किमी पर सेकंद अशा वेगाने यान फिरत होतं. त्याचा वेग आणखी कमी करण्यात आला आहे. झीरो स्पीड झाल्यानंतर शेवटची २२ सेकंद अत्यंत महत्त्वाची आहेत असं अभ्यासकांनी सांगितलं आहे.
चांद्रयान ३ च्या लँडरने आत्तापर्यंत २१ वेळा पृथ्वीची आणि चंद्राची १२० वेळा प्रदक्षिणा पुर्ण केली असून एकूण ५५ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.
आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे, साऱ्या जगाचे लक्ष चंद्राला गवसणी घालणाऱ्या भारताच्या या मिशन चांद्रयान -3 मोहीमेकडे लागले आहे. जेजुरीत खंडोबा गडावर श्री मार्तंड देव संस्थान, ग्रामस्थ मंडळ, पुजारी सेवक वर्ग यांनी आज कुलदैवत खंडोबास दुग्धाभिषेक करून भंडारा उधळला व हे यान सुरक्षितपणे उतरावे यासाठी प्रार्थना केली. खंडोबा देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, अधिकारी बाळासाहेब खोमणे, पुजारी गणेश आगलावे उल्हास बारभाई यावेळी उपस्थित होते.
चांद्रयान मोहिमेत संध्याकाळी ५.४४ मिनिटांनी विक्रम लँडर आपली जागा घेईल. विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर रँप उघडेल आणि त्यातून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला पहिला देश ठरणार आहे.
ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing Updates : चांद्रयान ३ सॉफ्ट लँडिंगसाठी आता अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. पुढच्या काही तासांत भारत एक ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे. चांद्रयान २ अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान ३ साठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर आता तो ऐतिहासिक क्षण अगदी जवळ येऊन ठेपलाय. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच जण आतुर झाले असून इस्रोमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले असून इस्रोने काही फोटो शेअर केले आहेत. त्यानुसार, चांद्रयान ३ साठी इस्रोमध्ये काय वातावरण आहे हे स्पष्ट होत आहे.
अगदी काहीच तासांत चांद्रयान ३ मोहीम शेवटच्या टप्प्यात येणार आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगसाठी अवघं जग आतूरतेने वाट पाहतंय. भारताची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिम असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. दरम्यान, ही मोहीम यशस्वी होण्याकरता अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपिअन स्पेस एजन्सी (ईएसए) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
भारताचं चांद्रयान २ ही मोहीम थोडक्यात अपयशी झाली होती. चंद्रावर हे विक्रम लँडर लँड होण्याआधीच इस्रोशी संपर्क तुटला होता. या अनुभवातून धडा घेत चांद्रयान ३ या मोहिमेत महत्त्वाचे बदल केले आहेत. चांद्रयान २ या मोहिमेतील लँडरला पाच इंजिन होते. चंद्रावर उतरताना यानाची गती कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला. मात्र यातून यानाला झटके बसले. त्यामुळे चुका झाल्या. आता सगळ्या शक्यता लक्षात घेऊन चांद्रयान ३ ची निर्मिती करण्यात आली आहे. चांद्रयान-३ मिशनमध्ये चंद्रावरील लँडिंग एरिया वाढवण्यात आला आहे. ४ किमी x २.५ किती असा एरिया आहे. परिस्थिती बिघडली, तर लँडरला लँडिंगसाठी जास्त जागा मिळावी, हा त्यामागे उद्देश आहे. ऐन मोक्याच्या क्षणी यानाला लँडिंगची जागा बदलावी लागली, जास्त प्रवास करावा लागला, तर त्यासाठी इंधनही जास्त ठेवण्यात आलं आहे अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.
ISRO च्या माहितीनुसार, जगभरात कुठूनही तुम्ही चांद्रयान-3 मोहिम लाईव्ह पाहू शकता. बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून हे स्ट्रीमिंग थेट प्रक्षेपित केले जाईल. आपण ISRO वेबसाइट, YouTube, ISRO चे Facebook पेज आणि DD National TV चॅनल इथे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात.
चांद्रयान ३ चं चंद्रावर लँडिंग होणार आहे, भारतासाठी आज गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे, भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे हे आज सगळ्यांना दिसेल. वेगवेगळ्या मोहिमेतून इस्रोच्या माध्यमातून वेगवान वाटचाल वैज्ञानिक मनोवृत्ती दिसून येत असून सगळ्यांमध्ये उत्साह आहे, म्हणून देशातील सर्व वैज्ञानिक यांचे अभिनंदन करू इच्छितो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बुलढाण्यातील रुद्र ढोल-ताशा पथकाच्यावतीने चांद्रयान-३ ला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. स्थानिक जयस्तंभ चौकात पथकातर्फे विविध आकारांच्या ढोलचा वापर करून
चांद्रयान- ३ ची प्रतिकृती तयार करण्यात आली. पथकाच्या सभासदांनी ‘भारत माता की जय, इंकलाब जिंदाबाद, चांद्रयान सफल रहें’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी चंद्रयान ३ चे लँडिंग सुरक्षित होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
चंद्रयान -3 चं यशस्वी लँडिंग व्हावी यासाठी धुळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवीची महाआरती करण्यात आली . यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मराठा संख्येने उपस्थित होते भारत माता की जय घोषणा देखील देण्यात आल्या.
भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. आज २३ ऑगस्ट रोजी हे यान सायंकाळच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठावर उतरणार असून इस्रोच्या या मोहिमेवर भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष असून सामान्य नागरिकही या क्षणासाठी आतुर आहेत.चंद्रयान -3 यशस्वी लँडिंग व्हावी कुठल्याही प्रकारच विघ्न येऊ नये व तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांच्या नेतृत्वात खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मातेची महाआरती करण्यात आली.
चांद्रयान-३ ची मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहे. चांद्रयान सुरक्षितपणे चंद्रावर उतरावं आणि मोहीम यशस्वी व्हावी यासाठी कडेगांव तालुक्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शंभू महादेवला साकडं घातले. यासाठी सागरेश्वर येथील मंदिरामध्ये दुग्धाभिषेक करीत महाआरती बुधवारी सकाळी केली. यावेळी अभाविप कडेगाव तालुका संयोजक- प्रथमेश पाटील, कडेगाव तालुका सहसंयोजक- राहुल सूर्यवंशी, वैभव सुतार, संग्राम मोहिते, गिरीधर सुतार, मंदार वर्तक, अक्षय होनमाने उपस्थित होते.
चांद्रयान २ ही आपली मोहीम अपयशी ठरली. त्यानंतर आता इस्रोच्या वैज्ञानिकांनी ही काळजी घेतली की या विक्रम लँडवरच्या सेन्सर्सनी काम केलं नाही तरीही सुखरुपपणे उतरणार आहे. यावर चार मोटर्स आहेत. त्यातल्या दोन सुरु झाल्या तरीही सॉफ्ट लँडिंग होईल. हे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर यावर चार उपकरणं आहेत. जी उपकरणं आपलं काम सुरु करतात. विक्रम लँडरमधून एक रोव्हर बाहेर पडणार आहे. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर एका सेकंदाला एक सेंटीमीटर या गतीने फिरणा आहे. वाटेत उंच सखल प्रदेश आला तरीही तो काम करणार आहे. या रोव्हरची जी सहा चाकं आहेत त्यावर इस्रोचं बोधचिन्ह कोरलेलं आहे ही माहिती सोमण यांनी दिली.
भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग होईल असा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. चांद्रयान २ च्या अपयशातून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.