Chandrayaan 3 : भारताची चांद्रयान ३ ही मोहीम फत्ते झाली आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा नेणारा पहिला देश ठरला आहे. भारताच्या नावे हा नवा रेकॉर्ड झालेला असतानाच आता ट्विटरवर चांगलीच चर्चा होते आहे ती रॉकेट वुमन रितू करिधाल यांची. डॉ. रितू करिधाल यांच्या खांद्यावर चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी देण्यात आली होती.
इस्रोच्या माहितीनुसार चांद्रयान ३ हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरवण्याची जबाबदारी ही वरिष्ठ महिला वैज्ञानिक रितू करिधाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. रितू करिधाल या चांद्रयान ३ च्या मिशन डायरेक्टर आहेत अशीही माहिती इस्रोने दिली आहे. याआधी डॉ. रितू या मंगळयानाच्या वेळई डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर आणि चांद्रयान-2 मध्ये मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या.
हे पण वाचा- “ते यान चंद्रावर व्यवस्थित लँड झालं तसं…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
चांद्रयान ३ च्या यशामागची महिला
चांद्रयान ३ ने बुधवारी म्हणजेच २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी सॉफ्ट लँडिंग केलं आणि इतिहास रचला. आता पुढचे १४ दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राचा अभ्यास करणार आहेत. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशात कमांड देण्याची ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी रॉकेट वुमन डॉ. रितू करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली होती.
कोण आहेत रितू करिधाल?
रितू करिधाल या मूळच्या लखनऊच्या. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या रितू यांना अगदी लहानपणापासूनच अवकाश,चंद्र-तारे यांच्याबद्दल विशेष आकर्षण होतं. त्यामुळे त्यामध्येच करिअर करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण तसं पुरेसं मार्गदर्शन देणाऱ्या संस्था किंवा ट्यूशन्स त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या. रात्रभर आकाशातल्या ताऱ्यांचं निरीक्षण करणाऱ्या रितू यांनी स्वत:ची वाट निवडली; खरंतर तयार केली. चमचमणाऱ्या ताऱ्यांमागे, गडद काळ्या आकाशामागे, चंद्र, त्याच्या बदलत्या कळांमागे नेमकी काय रहस्ये दडली असतील याचं त्यांना कायम कुतूहल वाटत असे आणि त्याची उत्तरे शोधण्याचा त्या स्वत:च प्रयत्न करीत.
Chandrayaan-3: चांद्रयान ३ पृथ्वीवर परतणार? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर १४ दिवसांनी काय करणार?
इस्रो, नासा या संस्थाबद्दल, अवकाश मोहिमांबद्दल जी काही माहिती, फोटो मिळत, ती कात्रणांच्या रुपांमध्ये जमवून ठेवायचा त्यांना छंद होता. लखनऊमधून फिजिक्समध्ये त्यांनी एम. एस्सी. पदवी मिळवली आणि ज्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समधून पदवी मिळवली तिथंच त्यांनी सहा महिने शिकवलंही. त्यानंतर बंगळुरुच्या इंडियन सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं.बंगळुरुमधील आयआयएससीमध्ये रितू यांनी एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतलं. १९९७ मध्ये त्या इस्रोमध्ये दाखल झाल्या. तेव्हापासूनच आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.