Chandrayaan 3 Update: चंद्राच्या पृष्टभागावर सूर्यास्त होताच, भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचा ऐतिहासिक लँडिंग पॉईंट ‘शिवशक्ती’ येथे पुन्हा अंधार झाला आहे. यापुढील १४ दिवस चंद्रावर मिट्ट काळोख असणार आहे. यापूर्वी जेव्हा चंद्रावर सूर्यास्त झाला होता तेव्हा विक्रम व प्रज्ञानला स्लीप मोड वर टाकण्यात आले होते. ३० सप्टेंबरला सूर्योदय होताच चांद्रयान ३ च्या दोन्ही शिलेदारांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न झाला पण याला यश आले नाही. आता पुन्हा एकदा चंद्रावर काळोख होणार असताना विक्रम व प्रज्ञान पुन्हा सुरु होण्याच्या आशा सुद्धा मावळल्या आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-3 मोहिमेने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ यशस्वीरित्या उतरवले होते. अशाप्रकारे दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला होता. यानंतर केंद्र सरकारने चांद्रयानाच्या लँडिंगच्या पॉईंटला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव देण्यात आले होते. हा पॉईंट चंद्राच्या उत्तर ध्रुवापासून अंदाजे ४,२०० किलोमीटर अंतरावर, मॅंझिनस सी आणि सिम्पेलियस एन क्रेटर्सच्या मध्ये वसलेला आहे. या मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ हे नाव देण्यात आले.
लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर नियोजित दोन आठवड्यांचे संशोधन कार्य राबवताना काही महत्त्वपूर्ण प्रयोग केले आणि त्यातून मौल्यवान डेटा गोळा केला. चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE) नावाच्या ऑनबोर्ड पेलोडचे ऑपरेशन राबवून विक्रम लॅण्डरने प्रथमच चंद्राच्या मातीचे तापमान वेगवेगळ्या स्तरावर मोजले.
चंद्रावर सूर्यास्त झाल्यावर तापमान अत्यंत थंड झाले होते. यामध्ये विक्रम व प्रज्ञानचे पार्ट्स सुद्धा थंड पडले होते. आता विक्रम व प्रज्ञानचे काम थांबले असले तरी चांद्रयान-3 द्वारे गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण आणि अभ्यास सुरू राहील असे इस्रोतर्फे सांगण्यात आले आहे.