भारताच्या चांद्रमोहिमेला छोटासा ब्रेक लागला आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात चंद्रावर उतरवलेलं चाद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करत होतं. परंतु, आता चंद्रावर अंधार पडल्याने इस्रोच्या संशोधनकार्याला छोटासा ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ मिळत होते. मात्र, आता चंद्रावर रात्र झाली आहे. पुढचे १४ दिवस चद्रावर गडद अंधार (चद्रावर १४ दिवस रात्र आणि १४ दिवस उजेड असतो) असणार आहे. त्यामुळे इस्रोचं अवकाशयान आता निष्क्रिय करण्यात आलं आहे.
चांद्रयान ३ हे सौरऊर्जेवर चालणारं यान आहे. या अवकाशयानाबरोबर पाठवलेली सर्व उपकरणं, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सौरऊर्जेवर काम करतात. परंतु, चंद्रावर आता रात्र झाल्याने ही सर्व उपकरणं निष्क्रिय करण्यात आली आहेत. म्हणजेच, ही सर्व उपकरणं आता स्लीप मोडमध्ये गेली आहेत.
इस्रोने रविवारी (३ सप्टेंबर) रात्री प्रज्ञान रोव्हरला झोपवलं (स्लीप मोड अॅक्टिव्हेट केला). त्यापाठोपाठ आज सकाळी ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) विक्रम लँडर झोपी गेला. विक्रमने निद्रावस्थेत जाण्यापूर्वी त्याची जागा बदलली. त्यासाठी विक्रमने एक मोठी उडी घेतली. विक्रमने संपूर्ण चांद्रयानासह त्याच्या आधीच्या जागेवरून ३० ते ४० सेंटीमीटर दूर आणि ४० सेंटीमीटर उंच उडी घेतली. ही उडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा विक्रमने दुसऱ्या जागी सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रमची ही उडी खूप महत्त्वाची आहे. कारण भविष्यातील सॅम्पल रिटर्न आणि मानव मिशनसाठी ते कामी येणार आहे.
विक्रम लँडरला स्लीपिंग कमांड देण्याआधी नवीन जागेवर सर्व पेलोड्सची तपासणी करण्यात आली. म्हणजेच विक्रम नव्या जागेवर गेल्यानंतर संपूर्ण अवकाशयान, सर्व पेलोड्स व्यवस्थित आहेत का याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व पेलोड्स बंद करण्याच्या कमांड्स देण्यात आल्या. आता चांद्रयानाचा केवळ रिसीव्हर सुरू आहे. जेणेकरून इस्रोच्या बंगळुरूतील कार्यालयातून अवकाशयानाला कमांड देता येतील. सूर्यावर दिवस उजाडल्यानंतर पुन्हा एकदा कमांड देऊन अवकाशयान सुरू केलं जाईल. सौरऊर्जेच्या सहाय्याने हे यान कार्यरत होईल. त्यानंतर पुन्हा एकदा, विक्रम आणि प्रज्ञान चंद्रावर संशोधन करू लागतील.
हे ही वाचा >> “प्रज्ञानपाठोपाठ ‘विक्रम’ही झोपी गेला, आता थेट…”, इस्रोकडून चांद्रमोहिमेचा पुढचा प्लॅन जाहीर, म्हणाले…
विक्रम लँडरने उडी मारल्यानंतरचा एक फोटोही इस्रोला पाठवला आहे. त्यानंतर इस्रोने विक्रम विक्रमने उडी मारण्याआधीचा आणि उडी मारल्यानंतरचा असे दोन फोटो शेअर केले आहेत.