Chandrayaan 3 Rover On Moon: २३ ऑगस्ट २०२३ या तारखेवर भारतीयांच्या यशाची मोहोर लागली आहे. भारताने चांद्रयान-३, हे दक्षिण ध्रुवावर चंद्रावर उतरवणारे पहिले राष्ट्र बनून इतिहासात आपले नाव कोरले या पराक्रमामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर यान यशस्वीरीत्या उतरवणाऱ्या यूएस, रशिया आणि चीनच्या बरोबरीने भारताला मानाचे स्थान मिळाले आहे. या अभूतपूर्व विजयाचे श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेचे आहे. आता यशस्वी लँडिंगनंतर इस्रोने माहिती दिली की चांद्रयान -3 रोव्हर – प्रज्ञान – विक्रम लँडरवरून खाली उतरले आहे आणि चंद्रावर फिरत आहे.
भारतात तयार झालेले “चांद्रयान-३ रोव्हर: (मेड इन इंडिया ?? मेड फॉर द मून?!) हे लँडरवरून खाली उतरले आणि भारताने चंद्रावर फेरफटका मारला! असे सांगत इस्रोने ट्वीट केले आहे. हे रोव्हर भारताची एक ठसठशीत ओळख सुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावर सोडून येणार आहे.
ISRO चे ट्वीट
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर अशोक स्तंभाचा ठसा कसा उमटवणार?
मिशनच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रोने जारी केलेला एक व्हिडिओ रोव्हरवरील लोगोचे ठसे दाखवतो. प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर नेव्हिगेट करत असताना, त्याची मागील चाके या लोगोचे ठसे पृष्ठभागावर उमटवतात. या पद्धतीचे विशेष डिझाईन या रोव्हरच्या चाकांचे केलेले आहे. लँडरवरून उतरताना रोव्हरची गती एक सेंटीमीटर प्रतिसेकंद इतकी आहे. इस्रोचा लोगो आणि अशोक स्तंभाच्या चिन्हाचा ठसा उमटवला जाणार आहे. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर फिरून परिक्षण करणार आहे.
लँडर आणि रोव्हर चंद्राच्या सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीवरील सुमारे १४ दिवसांच्या समतुल्य चंद्रावरील एका दिवसाच्या मिशनसाठी डिझाइन केलेले आहेत. या वेळेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याच्या संभाव्य उपलब्धतेचे परीक्षण केले जाणार आहे.तसेच चंद्रकंप, चंद्राच्या पृष्ठभागावरील उष्णतेचा प्रवाह, चंद्राजवळील प्लाझ्मा वातावरण आणि चंद्र आणि पृथ्वीमधील अचूक अंतर यांचा अभ्यास केला जात आहे.