ChatGPT: ओपन एआयचा एआय चॅटबॉट चॅट जीपीटी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हे एक अतिशय शक्तिशाली एआय साधन आहे, जे माणसांप्रमाणे उत्तरे देते. आज आम्ही तुम्हाला चॅट जीपीटीबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरं तर, या चॅटबॉटने, एका डिझाईन फर्मसाठी वकील म्हणून काम करत, अडकलेल्या पैशांपैकी १ लाख डॉलरपेक्षाही जास्त रक्कम वसूल केली आहे. जाणून घ्या हे प्रकरण नेमकं आहे तरी काय…
‘असे’ आहे प्रकरण
ट्विटरवर, ग्रेग इसेनबर्ग नावाच्या व्यक्तीने चॅट GPT द्वारे कंपनीने अडकवलेले $१,०९,५०० कसे परत मिळाले हे संपूर्ण प्रकरण सांगितले आहे. ग्रेग इसेनबर्गच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते Late Checkout चे सीईओ आहेत जे एक डिझाइन एजन्सी आहे. याआधी त्यांनी रेडिट इंक आणि टिक टॉकमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे.
इसेनबर्ग यांनी सांगितले की, बहुतेक लोक जेव्हा त्यांचे पैसे कुठेतरी अडकतात तेव्हा वकीलाची मदत घेतात, परंतु त्यांनी चॅट जीपीटीची मदत घेतली आणि त्यांचे काम झाले. ग्रेग इसेनबर्ग यांनी सांगितले की, २०२२ मध्ये त्यांच्या ग्रुपने एका लोकप्रिय ब्रँडला काही डिझाइन्स दिल्या होत्या. ब्रँडला डिझाईन आवडले आणि नवनवीन डिझाईन्स मागवत राहिले. ब्रँडने पैसे देण्याचे आश्वासन दिले होते पण तसे झाले नाही.
(हे ही वाचा : ChatGpt: आता Alexa प्रमाणेच ChatGPT ही तुम्हाला ऐकवणार गाणं? देणार तुमच्या प्रश्नाची उत्तरं )
ग्रेग इसेनबर्ग यांनी ट्विटरवर लिहिले की, त्यांच्या डिझाइन एजन्सीने १०० हून अधिक प्रकल्पांवर काम केले आहे आणि अनेक कोटी रुपये कमावले आहेत, परंतु त्यांनी कधीही कंपनीच्या पैशाची हेराफेरी करणारा क्लायंट पाहिला नाही. ग्राहक बरेच दिवस पैसे देत नसल्याने कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मन लावून काम करता येत नसल्याने ग्राहकावर कायदेशीर कारवाई करावी, असा सल्ला सर्वांनी दिला.
ChatGPT ने ‘अशी’ केली मदत
वकिलाकडे जाण्याऐवजी, ग्रेग इसेनबर्गने चॅट जीपीटीची मदत घेतली आणि चॅट जीपीटीला पैसे वेळेवर परत करण्यासाठी क्लायंटला ईमेल लिहायला सांगितले. इसेनबर्ग म्हणाले की, त्यांनी वकील नियुक्त केला असता तर त्यांना $१,००० खर्च आला असता, तर चॅट जीपीटीने हे काम विनामूल्य केले. ग्रेग इसेनबर्ग यांनी सांगितले की, क्लायंटला ई-मेल पाठवल्यानंतर काही वेळातच अडकलेले पैसे दिले गेले आणि त्यांची टीम आनंदी आहे.