चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेद्वारे भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलं आहे. या अवकाशयानाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी इस्त्रो या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूर्याच्या संशोधनातील भारताच्या भरारीचं कौतुक केलं आहे. तसेच या मोहिमेमध्ये पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचं अवकाश संशोधनातील स्थान बळकट झालं आहे. भारत जगातील असा चौथा देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर आपलं अवकाशयान उतरवून भारताने विक्रमच केला आहे. पाठोपाठ आपण सूर्याच्या संशोधनाच्या दृष्टीने आज आणखी एक मोठी झेप घेतली आहे. आदित्य एल-१ या पहिल्याच सूर्ययानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारत चंद्र आणि सूर्य संशोधनात कामगिरी करणारा आणि त्यामध्ये सातत्य राखणारा जगाच्या दृष्टीने महत्वाचा देश ठरला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, या सौरमोहीमेद्वारे केल्या जाणाऱ्या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावलं उचलता येणार आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य देश अशी ओळख निर्माण झाली आहे.

हे ही वाचा >> “आधी कुटुंब सांभाळा मग घराणेशाहीवर बोला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा टोला

मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे चंद्रयान-२च्या अपयशातून बाहेर पडून, इस्त्रोने ही मोठी भरारी घेतली आहे. यापुढेही इस्त्रोची कामगिरी अशीच उंचावणारी राहील, असा विश्वास आहे. इस्त्रोच्या या कामगिरीला तोड नाही. या मोहिमेत सहभागी सर्व संशोधक – वैज्ञानिक, अभियंत्यांचं अभिनंदन.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde praised isro after successfully launched aditya l1 solar mission asc
First published on: 02-09-2023 at 14:00 IST