सध्या सुरू असणारे २०२३ हे वर्ष तंत्रज्ञान विभागात काम करणाऱ्या मंडळींसाठी फारच कष्टाचे होते, असे म्हणायला हरकत नाही. यावर्षी अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अनेक टेक जायंट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या मध्येच अचानक कामावरून काढून टाकल्याच्या, लेऑफच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळाल्या आहेत. लिंक्डइन या ॲपवर तर अशा बातम्यांचा पाऊस पडला होता. अनेकांनी त्यांना अचानक एकेदिवशी कामावर काढून टाकल्याचा मेल मिळाला आणि आता त्यांच्याकडे करण्यासारखे काहीच नाहीये असे सांगितले. तर काहींनी आम्हाला पहाटे ४ वाजता लेऑफचा मेल आला असे सांगितले. तर काहींनी, आम्ही मॅटर्निटी लिव्हवर असतानाच आता आमच्याकडे जॉब नाहीये हे आमच्या लक्षात आले. अशा स्वरूपाच्या अनेक पोस्ट आपल्याला तिथे पाहायला मिळत होत्या.
मायक्रोसॉफ्टचे माजी एचआर व्हीपी, ख्रिस विलियम्स यांनी आपल्या बिझनेस इसाईडरच्या एका लेखात लेऑफ मिळाल्यानंतर काय करणे गरजेचे आहे, याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स, सूचना दिलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनादेखील अशा लेऑफचा फटका बसला असल्याचे ख्रिस यांनी सांगितले असून, असे काही झाल्यानंतर कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, याबद्दल सर्वांना माहिती असावी असे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : केवायसी (KYC) अपडेट करायला गेले आणि सर्व कमाई गमावून बसले हे आजोबा; काय आहे प्रकरण जाणून घ्या…
लेऑफनंतर या गोष्टी लक्षात ठेवा :
लेऑफनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विचारपूर्वक पेपरवर्क पूर्ण करणे. आपल्याला अचानक कामावरून निघून जावे लागत आहे या विचारांनी कधीकधी व्यक्तीचे चित्त थाऱ्यावर नसते. परंतु, अशावेळेस पेपरवर्क करण्याकडे एखाद्याचे संपूर्ण लक्ष असणे अत्यंत गरजेचे असते. कोणत्याही कागदांवर सही करण्यापूर्वी, त्यामध्ये लिहिलेला सर्व मजकूर वाचून आणि समजून मगच काम पूर्ण करावे.
दुसरी गोष्ट म्हणजे, या सर्व प्रकरणात तुम्हाला स्वतःसाठी काही फायद्याच्या गोष्टी करता येत आहेत का याचा विचार करावा. तुम्ही जर ‘प्रोटेक्टेड क्लास’ [आरक्षण] मध्ये येत असाल, स्त्रिया ज्या गरोदर आहेत, जे मेडिकल लिव्हवर आहेत अशांना कंपनीच्या लेऑफच्या टर्म्स आणि कंडिशन्समध्ये काही बदल करून घेता येऊ शकतो का हे तपासावे.
“तुमचा कार्यकाळ [tenure] वाढवला असल्यास किंवा कंपनीला ज्या गोष्टी, स्किल्सपासून फायदा होऊ शकतो, अशा गोष्टींचे ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर या गोष्टींचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. अशा विशेष स्किल्समुळे कंपनी कदाचित तुम्हाला ऑफर केलेल्या पॅकेजनुसार परत कामावर ठेवून घेऊ शकते.” असे विलियम्स यांनी आपल्या लेखात लिहिले आहे.
तुम्ही जर प्रोटेक्टेड क्लास/ आरक्षित वर्गाचे असल्यास किंवा तुमचे विशिष्ट असे स्टेटस असल्यास, तुम्ही कायदेशीर मार्गांचा अवलंब करू शकता. यासाठी एखाद्या वकिलासोबत चर्चा केल्यास फायद्याचे ठरू शकते. यासोबतच या सर्व लेऑफ प्रकरणामध्ये एखाद्या वकिलाचा सल्ला घेणे किंवा पेपरवर्क वकिलाच्या नजरेखालून गेल्यास त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. कायदेशीररित्या सर्व गोष्टी पडताळून पाहिल्याने तुम्हाला योग्य तो न्याय मिळू शकतो.
हेही वाचा : अनावश्यक E-mails ने अकाउंट झालंय फुल? आता एका क्लिकवर करा सगळे ईमेल्स डिलीट; पाहा ही ट्रिक….
या सर्व गोष्टींनंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे, आपले लिंक्डइन अकाउंट अपडेट करण्याची. तुमच्यासोबत घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचावी की नाही याबद्दल तुम्ही विचार करू शकता. त्यासोबतच तिथे असणाऱ्या कामाच्या संधी शिकण्यास सुरुवात करू शकता.
विलियम्स अजून एक महत्वाची टीप देतात, ती म्हणजे आपले प्रोफेशनल नेटवर्क सतत वाढवत राहणे. तुम्हाला जरी कामावरून काढले नसेल, लेऑफ केले नसले तरीही प्रोफेशल जगात तुमचे जर नेटवर्क मजबूत असेल तर त्याचा तुम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा होईल.