जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम जगातील नोकऱ्यांवर झाला आहे. अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. यामध्ये एका मनोरंजन क्षेत्रातील कंपनीचासुद्धा समावेश आहे.
मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या डिस्ने कंपनीने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरविले आहे. बिझनेस इनसाईडरच्या रिपोर्टनुसार डिस्ने एप्रिल महिन्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना पाहत आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांना कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. मात्र आतापर्यंत ही माहिती समोर आलेली नाही की कंपनी कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.
हेही वाचा : Disney + Hotstar च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; IPL आणि HBO बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
वॉल्ट डिस्ने कंपनीची कर्मचारी कपात करण्याची ही काही पहिली वेळ नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनीने तब्बल ७,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी ही दुसरी टाळेबंदीची योजना बनवली आहे. बॉब इगर यांनी फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या वेतनात कपात करण्याची घोषणा केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले होते की, अशी पावले उचलून कंपनी अब्जावधी डॉलर्सची बचत करण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारीतील कर्मचारी कपातीनंतर डिस्ने पुन्हा एकदा एप्रिलमध्ये कर्मचारी कपातीची योजना आकाशात आहे. या संदर्भात अद्याप कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.