नुकतीच IPL 2023 ही स्पर्धा पार पडली. यावर्षीचे विजेतेपद हे चेन्नई सुपर किंग्स या टीमने पटकावले. संपूर्ण आयपीएल स्पर्धा JioCinema वर पाहता येत होती. मोफत स्पर्धा दाखवल्यामुळे जिओसिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यापाठोपाठ आता डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्मने देखील आशिया कप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपचे मोबाइलवर मोफत स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिस्नी + हॉटस्टारने या OTT प्लॅटफॉर्मने हे जाहीर केले आहे, ज्यांच्याकडे डिस्नी + हॉटस्टार असलेल्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांना या दोन्ही स्पर्धा मोफत पाहता येणार आहेत. क्रिकेट या खेळाचे लोकशाहीकरण करणे आणि भारतातील जास्तीत जास्त मोबाईल वापरकर्त्यांना ते उपलब्ध करून देणे हा कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
डिस्नी + हॉटस्टारचे प्रमुख साजिथ शिवनंदन यांच्या अधिकृत विधानानुसार, ” डिस्नी+ हॉटस्टार भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ओटीटी व्यवसायामध्ये आघाडीवर राहिले आहे. तसेच दर्शकांना चांगला अनुभव मिळावा म्हणून आम्ही अनेक नवीन कल्पना सुरू केल्या आहेत. त्या विविध नवकल्पनांमुळे आम्हाला आमच्या दर्शकांना खुश करता आले आहे. आशिया कप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप या स्पर्धा मोबाइल वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला इको सिस्टीम विकसित करण्यासाठी मदत मिळेल. ”
जिओसिनेमावर आयपीएल २०२३ संपल्यानंतर आणि डिस्नी + हॉटस्टारवर WTC फायनल सुरू झाल्यानंतर दर्शक या प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. जिओ सिनेमावर तब्बल ३.२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा अंतिम सामना पहिला आहे. या संख्येने आधीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले असून जिओसिनेमाने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या क्वालिफायर २चा सामना जो मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये खेळला गेला त्यामध्ये २.५७ कोटी लोकांनी जिओसिनेमावर हा सामना पाहिला. ज्यामध्ये गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने १२९ धावांची शानदार खेळी केली होती.