काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे ५ जी सेवेचा शुभारंभ केला. यानंतर देशातील दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना ५ जी सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, ही सेवा वापरण्यासाठी स्मार्टफोन ५ जी नेटवर्कला सपोर्ट करणे गरजेचे आहे. यावरून तुमच्या जवळील अ‍ॅपल फोन ५ जी सपोर्ट करतो का? हा प्रश्न नक्कीच आता तुम्हाला पडला असेल.

५ जी हा ४ जी पेक्षा दहापट वेगाने चालतो, असे सांगितल्या जाते, त्यामुळे तुम्हाला ही सेवा नक्कीच हवी असणार, नाही? तर आज आपण अ‍ॅपलच्या कोणत्या फोनमध्ये ५ जी सेवा चालते आणि कोणत्यामध्ये नाही? याबाबत जाणून घेऊया.

1) काय आहे ५ जी?

5 जी ही वायरलेस तंत्रज्ञानाची पुढची पिढी आहे. ही जलद इंटरनेट सेवा देत. ५ जी सेवा मिळायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला ४ जी पेक्षा १०० पट वेगाने इंटरनेट मिळेल, एचडी चित्रपट ३ सेकंदात डाऊनलोड होईल, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र वास्तविकता वेगळी आहे.

५ जी फोनला सेल्युलर सेवा वितरित करण्यासाठी तीन प्रकारचे रेडिओ सिग्नल असतात. लो, मीड आणि हाय बँड फ्रिक्वेन्सी. हाय बँड फ्रिक्वेन्सी भरपूर गती देते आणि त्याची बँडविड्थ देखील मोठी असते, मात्र त्याची रेंज कमी असते. लो बँडला मोठी रेंज आहे, मात्र त्यात गती नाही. मात्र रेंज आणि स्पिडच्या बाबतीत मीड बँड सोयिस्कर आहे. याचा वापर करून दूरसंचार कंपन्या ग्राहकांना ५ जी सेवा पुरवणार आहेत. तसेच तज्ज्ञांच्या मते ५ जी केवळ स्मार्टफोन पुरतेच मार्यादित न राहता ते इतर तंत्रज्ञान लोकांपुढे आणण्यात मदत करेल. स्वयंचलित कार, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, क्लाऊड गेमिंग आणि स्मार्ट शहर, यामध्ये ५ जी सेवा मदत करेल.

2) कोणत्या आयफोनमध्ये ५ जी चालते?

भारतात उपलब्ध असलेल्या सर्व नव्या आयफोन्समध्ये ५ जी सेवा चालते. आयफोन १२ हा पहिला ५ जी आयफोन होता आणि त्यानंतर लाँच झालेला प्रत्येक आयफोन हा पुढील पिढीच्या वायरलेस तंत्रज्ञानाल सपोर्ट करतो. आयफोन १२, आयफोन १२ प्रो, आयफोन १२ प्रो मॅक्स आणि आयफोन १२ मिनी हे सर्व ५ जी सेवा देतात. तसेच, आयफोन १३ चे सर्व मॉडेल्स जसे, आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स हे ५ जी फोन आहेत.

अ‍ॅपलची नवीन आलेली आयफोन सिरीज १४ देखील ५ जी सेवेला सपोर्ट करते. इतकेच नव्हे तर, आयफोन एसई २ देखील ५ जी सपोर्ट करतो. केवळ आयफोन १२ सिरीजपूर्वी लाँच झालेल्या फोन्समध्ये ५ जी सेवा मिळत नाही. यात आयफोन एसई (२०२०) आणि आयफोन ११ सिरीजचा समावेश आहे.

3) भारतात ५ जी असलेल्या आयफोनची किंमत किती?

नवीन लाँच झालेल्या आयफोन १४ ची किंमत ७९ हजार ९०० पासून सुरू होते. आयफोन १४ प्लस हा ८९ हजार ९०० रुपयांना मिळतो. १४ प्रो ची किंमत १ लाख २९ हजारपासून सुरू होते. आणि १४ प्रो मॅक्सची किंमत १ लाख ३९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. यांच्या तुलनेत १२८ जीबी असलेला आयफोन १३ हा बेस मॉडेल आता ६९ हजार ९०० रुपयांना मिळत आहे. आयफोन १२ देखील अ‍ॅपलच्या संकेतस्थळावर ५९ हजार ९०० रुपयांना मिळत आहे.

4) अ‍ॅपलवर ५ जी सेवा कुठे मिळणार?

भारतात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया हे ५ जी सेवा पुरवणार आहेत. जिओ टप्प्याटप्प्याने ही सेवा देणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे दिवाळीपर्यंत ५ जी सेवा मिळेल. हळू हळू ही सेवा विस्तारणार असल्याचे जिओचे म्हणणे आहे. एअरटेलची ५ जी सेवा ही दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि बंगळुरूसह ८ मोठा शहरांमध्ये उपलब्ध होईल. कंपनी ५ जी सेवा मार्च २०२४ पर्यत संपूर्ण देशात विस्तारेल.

5) आयफोनमध्ये ५ जी सेवा वापरण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?

आतापर्यंत कुठल्याही दूरसंचार सेवा कंपन्यांनी आपले ५ जी प्लॅन्स उघड केलेले नाहीत. ५ जी सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरवठादार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने त्यांना योग्य किंमतीत ५ जी सेवा सुरू करणे गरजेचे असणार आहे. ५ जी प्लॅन्स हे ४ जी पेक्षा महागच असण्याची शक्यता आहे.

Story img Loader