Dream11 App Hacked: क्रिकेट आणि इतर खेळांवर आपला संघ निवडून त्यावर बक्षीस जिंकण्याची संधी हल्ली अनेक फँटसी लीग ॲप देत असतात. मात्र या ॲपवर युजर्सचा डेटा सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच ड्रीम११ ॲप हॅक झाल्याची धमकी देण्यात आली होती. प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर सायबर विभागाने तात्काळ कारवाई करत ड्रीम११ ची पालक कंपनी असलेल्या स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. सुरक्षा संचालक अभिषेक प्रताप सिंह यांना ताब्यात घेतले आहे. खंडणी वसूल करण्यासाठी त्यांनी ड्रीम ११ चा संवेदनशील डेटा हॅक केला, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सिंह यांनी ड्रीम११ कंपनीच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे डेटा लिक करण्याची धमकी दिली. यापैकी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन एक होते. या ईमेलमध्ये लिहिले होते, “ड्रीम११ च्या १२०० महत्त्वाच्या फाईल्सचा एक्सेस आमच्याकडे आहे. डार्क वेबवर या फाईल्स अपलोड करण्यापासून तुम्हाला रोखायचे असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता”
हे वाचा >> iPhone वापरताय? मग ही चार चिन्हं टाईप करताच फोन होईल क्रॅश; आयफोनमध्ये नवा बग सापडला!
पोलिसांनी पुढे सांगितले की, सदर ईमेलसह पुरावा म्हणून ६१ फाईल्स जोडण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये संवेदनशील डेटा होता. हा डेटा जर लीक झाला असता तर ड्रीम ११ ॲपची संपूर्ण प्रणाली कोलमडली असती.
या पहिल्या ईमेलला ड्रीम११ च्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपाध्यक्षांनी उत्तर दिले. “तुमच्याकडे कधी वेळ आहे, आपण यावर चर्चा करू”, असे उत्तर त्यांनी पाठवले. तसेच १२ ऑगस्ट रोजी सिंह यांनी या ईमेलला प्रत्युत्तर देताना म्हटले, “बाजारात हा डेटा विकत घेण्यासाठी अनेकजण तयार आहेत. तुमची काय ऑफर आहे ते कळवा.”
या दुसऱ्या ईमेलनंतर ड्रीम११ चे कर्मचारी जमशदी भूपती यांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली. आमचा डेटा हॅक करून खंडणी मागण्याचा प्रयत्न होत आहे, असे तक्रारीत म्हटले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीचा माग काढला आणि बंगळुरू कर्नाटक येथून राहत्या घरातून आरोपीला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीने ड्रीम११ कंपनीला ज्या ईमेलवरून डेटा लीक करण्याची धमकी दिली, तोही प्राप्त करण्यात आला. तसेच आरोपी सिंह यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्याला २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीला कंपनीचा संवेदनशील डेटा कसा काय मिळाला? याचा तपास आता पोलीस घेत आहेत. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.