Tesla Humanoid Optimus Robot: टेस्लाचा ह्यूमनॉइड रोबोट ऑप्टिमस वेगानं विकसित होत आहे. ऑप्टिमस आता काहीही करू शकतो, असे टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी We, Robot या कार्यक्रमात नुकतेच सांगितले. आपल्या घरातील दैनंदिन कामं करण्यासाठी ह्यूमनॉइड रोबोट उपयोगी पडू शकतो, असेही ते म्हणाले. जसे की, कुत्र्यांना फिरवून आणणं, मुलांचा सांभाळ करणं, बगीचा सजवणं आणि जेवण वाढणं वैगरे कामं रोबोट करू शकणार आहे. ऑप्टिमसच्या नव्या अवताराता रोबोटचा चालण्याचा वेग आणि त्याच्या हाताची हालचाल आधीपेक्षा बरीच सुधारण्यात आल्याचे मस्क यांनी सांगितले. हा रोबोट लोकांना घरातील दैनंदिन कामं करण्यात मोठा हातभार लावेल, अशी मस्क यांना अपेक्षा आहे.

व्ही, रोबोट या कार्यक्रमात टेस्लाच्या सायबरकॅब आणि रोबोवन यांचे विशेष आकर्षण होते. तर ऑप्टिमसनं सर्वांची मनं जिंकली. मस्क यांनी ऑप्टिमसच्या हालचालीबद्दल माहिती दिली. “रोबोट तुमच्याबरोबर चालू शकतात. भविष्यात रोबोटशी बोलताना तुम्हाला अधिक नैसर्गिक वाटेल. तुम्ही एका दुसऱ्या व्यक्तीबरोबरच राहत आहात, असे जाणवेल”, असे मस्क म्हणाले. यावेळी गंमत करताना ते म्हणाले की, रोबोट तुमच्या घरातील समारंभात पाहुण्यांना ड्रिंक्सही देऊ शकतात.

हे वाचा >> Tesla Job Offer: ७ तास चालण्यासाठी टेस्ला कंपनी देणार एका दिवसाचे २८ हजार रुपये

टेस्लाने अनावरण केलेल्या ऑप्टिमसच्या नव्या अवताराला जेन २ (दुसरी जनरेशन) असं म्हटलं जात आहे. आधीच्या अवतारापेक्षा यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. रोबोटचे सेन्सर, हात, पाय आणि बोटांच्या हालचाली मानवाप्रमाणे सहज करण्यात आल्या आहेत. यामळे ऑप्टिमसला आणखी अवघड कामं करणं सोपं जाणार आहे. हे रोबोट काय करू शकतात, याचा एक व्हिडीओ मस्क यांनी शेअर केला आहे.

या व्हिडीओत दिसते की, ऑप्टिमस रोबोट शर्टाची घडी घालतो. बाजारातून आणलेलं सामान पिशवीतून काढून टेबलावर मांडून ठेवतो, कुटुंबासह अनेक कामात तो सहभागी होतो. मस्क म्हणाले की, आम्ही हळुहळु रोबोटमध्ये विकास करत आहोत.

हे ही वाचा >> कुतूहल : उद्याच्या ह्यूमनॉइडशी जुळवून घेताना…

किंमत किती?

टेस्लाचा ह्यूमनॉइड रोबोट २० ते ३० हजार डॉलर्सना उपलब्ध होणार आहे. भारतीय रुपयांमध्ये किंमत लावायचे झाल्यास १६ ते २५ लाखांत हा रोबोट विकत घेता येऊ शकतो. पाश्चिमात्य देशांत जिथे घरातील कामं करण्यासाठी माणसं मिळत नाहीत. घर मालकांनाच घरातील सर्व कामं करावी लागतात. या देशांत अशा रोबोट्सना अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.

टेस्लाने २०२१ साली ऑप्टिमस रोबोटची कल्पना मांडली होती. मानव जी धोकादायक कामं करतो, ती करण्यासाठी रोबोटची निर्मिती करण्याची कल्पना मांडली गेली. मात्र हा रोबोट तयार करण्यात आणखी वेळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ साली एलॉन मस्क यांनी ऑप्टिमसची पहिली आवृत्ती सादर केली होती. ज्यामध्ये रोबोट साधी साधी कामं करताना दिसत होता. जसे की, घरातील कुंड्यांना पाणी घालणे वैगरे. मात्र दुसऱ्या जनरेशनमध्ये काही बदल केले आहेत.