एक्स (पूर्वीचे ट्विटर) हे एलॉन मस्क यांच्या मालकीचे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आता एक्स वापरकर्त्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. आधी सोशल मीडिया वापरकर्ते ऑडिओ व्हिडीओ कॉलसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करायचे. मात्र आता वापरकर्त्यांना एक्स चा वापर देखील ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसाठी करता येणार आहे. एक्स प्लॅटफॉर्मने हे फिचर आपल्या वापरकर्त्यांसाठी सुरु केले आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एक्स वापरकर्त्यांना आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ऑडिओ-व्हिडीओ कॉल फीचरचा वापर करू शकणार आहेत. सध्या हे फिचर एक्स प्रीमियम (ट्विटर ब्ल्यू ) वापरकर्त्यांसाठी असणार आहे. तसेच हे फिचर iOS डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी असणार आहे. थोड्या कालावधीनंतर हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध करून दिले जाऊ शकते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
जर का तुम्ही मोफत एक्स वापरत असाल तर तुम्ही देखील या फीचरचा वापर करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. तुम्हाला कोणी कॉल केला पाहिजे हे तुम्ही तुमच्या डायरेक्ट मेसेजिंग सेटिंग अड्जस्ट करून ठरवू शकता. तुम्ही ज्यांना फॉलो करता त्यांचे कॉल तुम्हाला येऊ शकतात.
एक्सवर कॉल कसा करावा ?
१.सर्वात पहिल्यांदा डायरेक्ट मेसेज ओपन करावे.
२. त्यानंतर सध्याचे चॅट किंवा नवीन चॅट निवडावे.
३. फोनच्या चिन्हावर क्लिक करावे.
४. त्यानंतर तुम्हाला ऑडिओ किंवा व्हिडीओ हे पर्याय दिसतील.
५. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी यातील एक पर्याय तुम्ही निवडू शकता.
एकदा का तुम्ही कॉल सुरु केला की, ज्या व्यक्तीला तुम्ही कॉल करत असाल त्याला एक सूचना मिळेल. जर का त्याने उत्तर दिले नाही तर त्यांना मिस्ड कॉल आल्याची सूचना देखील प्राप्त होईल. एलॉन मस्क यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये या फीचरची घोषणा केली होती. ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग हे फिचर केवळ आयफोनवर नाही तर अँड्रॉइड डिव्हाइस, मॅक कॉम्प्युटर आणि नॉर्मल पीसीवर पण काम करणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला फोन नंबरची आवश्यकता लागत नाही.