मागील वर्षी ओपनएआयने ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला होता. त्यानंतर त्याला स्पर्धा करण्यासाठी अनेक टेक कंपन्यांनी आपले AI चॅटबॉट लॉन्च केले आहेत तर काही जण त्यावर काम करत आहेत. यामध्येच आता एक नवीन बातमी समोर येत आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे देखील आता AI लॉन्च करणार आहेत.
AI क्षेत्रामध्ये Google आणि Microsoft शी आव्हान देण्यासाठी अब्जाधीश एलॉन मस्क हे AI प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहेत. फॉक्स न्यूजवर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत मस्कयांनी या एआय प्लॅटफॉर्मला ‘TruthGpt’ असे नाव दिले. एलॉन मस्क यांनी मायक्रोसॉफ्ट समर्थित ओपनएआयवरही टीका केली. एलॉन मस्क म्हणाले, चॅटजीपीटी चॅटबॉट तयार करणाऱ्या फर्मने ‘AI’ ला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ”OpenAI आता केवळ फायद्यासाठी ‘क्लोज्ड सोर्स’ असणारा प्लॅटफॉर्म आहे जो ‘मायक्रोसॉफ्टशी जवळून जोडलेला आहे.”
एलॉन मस्क यांनी गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांचावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची सुरक्षा गांभीर्याने न घेतल्याचा आरोपही केला. फॉक्स न्यूज चॅनलच्या टकर कार्लसनला सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीत मस्क म्हणाले, ‘मी असे काहीतरी सुरू करणार आहे. ज्याला मी ‘TruthGPT’ किंवा जास्तीत जास्त सत्यशोधक AI म्हणतो, जे विश्वाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करते. ते म्हणाले की ट्रुथजीपीटी हा सुरक्षिततेचा सर्वोत्तम प्रकार असू शकतो. त्यामुळे मानवाचा नाश होण्याची शक्यता नाही. मस्क म्हणाले की हे केवळ ‘उशीरा सुरू होत आहे’. पण मी तिसरा पर्याय काढण्याचा प्रयत्न करेन.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, एलॉन मस्क हे ओपनएआयचे नवीन प्रतिस्पर्धी एआय स्टार्टअप सुरू करण्यासाठी गुगलच्या एआय संशोधकांना सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी माहितीनुसार, मस्क यांनी गेल्या आठवड्यात नेवाडामध्ये X.AI कॉर्प नावाच्या एका फर्मची नोंदणी केली होती.
हेही वाचा : Elon Musk यांच्याशी गप्पा मारण्याची संधी; ‘या’ सेशन अंतर्गत विचारता येणार प्रश्न, फक्त…
एलॉन मस्क यांनी २०१५ मध्ये ओपनएआयची स्थापन केली होती. मात्र २०१८ मध्ये ते कंपनीतून बाहेर पडले. टेस्ला आणि स्पेसएक्सवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे संगत त्यांनी ओपनआय सोडल्याचे सांगितले.