पुढच्या ३० वर्षांत मंगळ ग्रहावर मानवी वस्ती झालेली असेल, असे भाकीत एलॉन मस्क यांनी वर्तविले आहे. एक्स या साईटवरील एका युजरच्या पोस्टला उत्तर देत असताना ‘स्पेसएक्स’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी पुढच्या ३० वर्षांतील योजना सांगितली. ५२ वर्षीय अब्जाधीश एलॉन मस्क म्हणाले, “पुढच्या पाच वर्षात मानवरहीत यान मंगळ ग्रहावर पाठविले जाईल. त्यानंतर १० वर्षांपर्यंत मानव मंगळावर पाऊल ठेवले. पुढच्या २० ते ३० वर्षात मंगळावर मानवी वस्ती झालेली असेल.” मस्क यांचे मंगळ ग्रहाबाबतचे आकर्षण नवे नाही. याआधीही त्यांनी स्पेसएक्सच्या माध्यमातून ग्रहांची शोधमोहीम केली होती.
मंगळ ग्रहाबाबत खगोलशास्त्रज्ञांना कायमच रस राहिला आहे. मंगळ ग्रहावर नासाचे रोव्हर संशोधन करत आहे. मंगळ ग्रहावरील परिस्थिती मानवासाठी अनुकूल असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळे येथे मानवी वस्ती केली जाऊ शकते, असे सांगितले जाते. एलॉन मस्क यांनी २००२ साली स्पेसएक्सची स्थापना केली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मानवांना घेऊन जाणारी ती पहिली खासगी कंपनी आहे.
मंगळ ग्रहावर वृक्ष लागवड करण्यासाठी एलॉन मस्क आग्रही आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच वर्षात मानवरहीत यान पाठविले जाऊ शकते. याशिवाय मस्क यांची कंपनी स्टारशिप बनविण्याच्या कामातही गुंतली आहे. सदर स्टारशिप हे जगातील सर्वात शक्तीशाली प्रक्षेपक असेल, असे सांगितले जाते. त्याशिवाय पुढच्या दहा वर्षात मानव मंगळावर पोहोचलेला असेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
एलॉन मस्क यांच्या एक्स अकाऊंटला १८.३ कोटी लोक फॉलो करतात. मस्क यांनी सदर बातमी दिल्यानंतर एका युजरने गमतीशीर प्रतिक्रिया दिली. युजरने म्हटले, अतिशय अकल्पनीय अशी ही संकल्पना वाटते. मला आशा आहे की, ही प्रगती पाहण्यासाठी मी आणखी १० वर्ष जगावे.
भारताची मंगळ मोहीम कधी?
मंगळ ग्रहावर चीन आणि अमेरिका पोहोचला आहे. इस्रोनेही मंगळावर मोहीम आखण्याचे नियोजन केले आहे. मंगळ ग्रहावर रोव्हर उतरविण्याची योजना इस्रोकडून आखण्यात येत आहे. लवकरच मंगळयान २ ही मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त जाहीर करण्यात आले होते.