पहिल्या व्हिडीओमध्ये एक माकड कॉम्प्युटरवर चक्क पिंगपॉंगचा गेम खेळतय तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये दुसरं एक माकड चक्क संगणकाच्या स्क्रीनकडे पाहात टायपिंग करतंय… हे दोन्ही व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाले असून या व्हिडीओमध्ये सोबत दिसतात ते ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क. एलॉन मस्क यांच्या न्युरालिंक या कंपनीने केलेल्या अनोख्या प्रयोगांचाच हा एक भाग आहे.
एलॉन मस्क जगभरात ओळखले जातात ते आगळ्या वेगळ्या प्रयोगांसाठी. स्पेसेक्सची सुरुवात केली त्यावेळेस हा खासगी अंतराळ प्रयोगाचा घाट कशासाठी हा माणूस घालतोय, असा प्रश्न जगभरात अनेकांना पडला होता. कोण जाणारे अंतराळ प्रवासासाठी आणि एवढे पैसे असणारे तरी किती असतील जगात असे प्रश्न तेव्हा विचारले गेले. या साऱ्यांचे प्रश्न मस्क यांनी खोटे ठरवले, स्पेसेक्सच्या मदतीने अंतराळात जाणाऱ्यांची प्रतीक्षा यादी अर्थात वेटिंग लिस्ट सध्या वाढते आहे. या नंतर एलॉन मस्क म्हणजे भविष्यवेधी उद्योजक अशी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. म्हणूनच त्यांनी ट्विटर विकत घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस जगभरात त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. मात्र ट्विटरच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतर ते वादात सापडले.
आणखी वाचा : Jio, Airtel, Vi ग्राहकांसाठी महत्वाची बातमी: नवीन सिम कार्ड २४ तासांसाठी राहणार बंद; कारण आलं समोर
मात्र एलॉन मस्क ओळखले जातात ते त्यांच्या अनोख्या प्रयोगांसाठी. जगाचे भविष्य तुलनेने आधी ओळखणारा माणूस, अशी त्यांची प्रतिमा आहे. न्युरालिंक हा देखील असाच एक भविष्यवेधी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत माणसाच्या मेंदूमध्ये एक चिप बसवायची आणि त्याद्वारे संगणकाशी जोडले जात अनेक गोष्टी करायच्या असे त्याचे ढोबळ स्वरूप आहे. मेंदुला जोडलेल्या चिपच्या माध्यमातून माणसाच्या हालचाली नियंत्रित करता येतात, हे या पूर्वीच्या काही प्रयोगांमधून सिद्धही झाले आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने व्यापारी वापर करण्याचा मस्क यांच्या या कंपनीचा विचार आहे. त्याचा पहिला प्रयोग त्यांनी दोन माकडांवर केला, त्याचेच व्हिडिओ त्यांनी बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात दाखवले.
आणखी वाचा : व्हॉट्सअॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा
पहिल्या व्हिडिओमध्ये पेजर नावचे माकडे कॉम्प्युटरवर पिंगपाँगचा गेम खेळताना दिसते तर दुसरे माकडे संगणकावर दिसणाऱ्या कीबोर्डवर टाइप करताना दिसते आहे. प्रत्यक्षात काय टाइप होते आहे, याची माकडाला कल्पना नाही. कारण ते समोर दिसणाऱ्या कर्सरवर जाऊन क्लिक करते आहे. ही क्लिक करण्याची कृती त्यांच्या मेंदूत बसविण्यात आलेल्या चिपद्वारे नियंत्रित केली जाते. भविष्यात या चिपचा वापर कंपवात किंवा पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी करण्याचा त्यांचा विचार आहे. कारण पक्षाघात किंवा कंपवातामध्ये अनेक अवयव काम करेनासे होतात. त्याचप्रमाणे ही चिप पाठीच्या मणक्यात बसवून ज्यांना मणक्याचे किंवा पाठीचे विकार आहेत, त्यांच्यासाठीही तिचा करण्याचा मानस मस्क यांनी या प्रसंगी बोलून दाखवला.