Elon Musk यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये सातत्याने नवीन बदल करण्यात येत आहेत. स्वतःचे अकाउंट प्रायव्हेट करणे, किंवा कमर्चाऱ्यांची कपात करणे असो या निर्णयांमुळे एलॉन मस्क हे कायम चर्चेत असतात. मात्र मस्क यांनी केलेल्या टाळेबंदीमुळे एलॉन मस्क हे अडचणीत सापडले आहेत. मोठ्या प्रमाणात टाळेबंदी केल्यामुळे ट्विटर हे अमेरिकन तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. अमेरिकन संसद काँग्रेसच्या अहवालातून समोर आलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. FTC आधीच सोशल मीडिया कंपनीच्या गोपनीयता आणि सायबर सुरक्षा पद्धतींची तपासणी करत आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून फेडरल ट्रेड कमिशन ट्विटरने घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांची चौकशी करत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका नवीन अहवालानुसार कंपनीने मोठ्या प्रमाणात केलेल्या कर्मचाऱ्यांची कपात तसेच ट्विटर ब्लू टिक लॉन्च करणे व थाकथित “ट्विटर फाइल्स” सह संबंधित पत्रकारांशी कंपनीचे व्यवहार या प्रकरणांचा समावेश आहे. अमेरिकन संसद कॉंग्रेसच्या अहवालाला उत्तर देताना FTC ने म्हटले की , ग्राहकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हे योग्यच आहे जे एफटीसीने केले पाहिजे.

हेही वाचा : Tech Layoffs: मोठी बातमी! एलॉन मस्ककडून Twitter मध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या

मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याच्या पाच महिन्याच्या अगोदर २०११ च्या संमती आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ट्विटरने $१५० दशलक्ष (सुमारे १,२३० कोटी ) इतका दंड भरला होता. वॉल स्ट्रीट जर्नलनच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांची कपात, Twitter blue tick आणि ट्विटर संबंधित फाईल्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी FTC ने Twitter ला किमान डझनभर पत्रे पाठवली आहेत. चौकशीचा एक भाग म्हणून एजन्सी मस्कला पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हाऊस ज्युडिशियरी कमिटीने ट्विटरवर एफटीसीच्या चौकशीचा अहवालही जारी केला आहे.

एलॉन मस्क यांनी आपल्या एका ट्विटमध्ये FTC च्या कृतीला “राजकीय हेतूंसाठी सरकारी एजन्सीला शस्त्र म्हणून वापरणे आणि सत्य दडपण्याचे प्रकरण आहे असे म्हटले आहे. हाउस ज्युडिशियरी कमिटीच्या रिपब्लिकन सदस्यांनी देखील एफटीसीच्या तपासावर ‘छळ’ अशी टीका केली आहे.