टेस्ला मोटर्सचे सीईओ एलॉन मस्क सध्या ट्विटर डिलमुळे चर्चेत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दोघांमधील विक्रीचा करार फिस्कटला आणि प्रकरण थेट न्यायालयात गेले. त्यानंतर एलॉन यांनी ट्वटर पुन्हा विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे.

न्यायालयाने विक्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी 28 ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर ट्विटर ताब्यात घेण्यासाठी मस्क यांच्या हालचाली सुरू झाल्या. मस्क यांनी बुधवारी ट्विटर मुख्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्यालयात त्यांनी केलेल्या अनोख्या एन्ट्रीची सर्वत्र चर्चा होत आहे.

(दिवाळीत टीव्ही, स्मार्टफोन, फ्रिज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी वाचा, होईल मोठी बचत)

मस्क एक सिंक घेऊन ट्विटरच्या मुख्यालयात गेले. सिंक घेऊन मुख्यालयात फिरत असल्याचा व्हिडिओ एलॉन यांनी शेअर केला आहे. व्हिडिओला त्यांनी ‘ट्विटर हेडक्वार्टरमध्ये प्रवेश, लेट दॅट सिंक इन! असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये मोठ्या आनंदात एक सिंक घेऊन एलॉन तुम्हाला ट्विटर मुख्यालयाच्या आत येताना दिसून येईल. त्यांच्या या कृत्याचे अनेक अर्थ अमेरिकन माध्यमांकडून काढले जात आहेत.

ट्विटरचा ताबा मिळण्यापूर्वी मस्क ट्विटरला समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीएनएनने लिहिले आहे. एलॉन या आठवड्यात मुख्यालयाला भेट देतील, या माहितीला ट्विटरने दुजोरा दिला होता. मात्र, त्यावर अधिक स्पष्टीकरण दिले नाही. एलॉन स्वत: ट्विटरच्या मुख्यालयात गेले आणि त्यांनी आपल्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला. त्यांनी दोन ट्विट केले.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांबद्दल माहिती दिली. ऑफिसमध्ये अनेक चांगल्या लोकांशी भेट झाल्याचे मस्क यांनी ट्विटमधून सांगितले. ट्विटर डिलबाबत मस्क खूपच उत्साहित असल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच त्यांनी आपले ट्विटर प्रोफाइलचे बायो अपडेट केले. यामध्ये त्यांनी चिफ ट्विट. असे लिहित आपणच कंपनीचे सर्वोच्च बॉस असल्याचे संकेत दिले होते.

(ईमेल खाते हॅक झाल्यास तातडीने ‘या’ गोष्टी करा, भविष्यात अशा घटनांपासून मिळू शकते सुरक्षा)

गेल्या सहा महिन्यात ट्विटरच्या खरेदी व्यवहारांत अनेक चढ उतार पाहायला मिळालेत. मस्क यांनी ट्विटरचे प्रत्येक शेअर ५४.२० डॉलरमध्ये घेण्याची घोषणा केली होती. सुरुवातील ट्विटरने ही डिल रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर मस्क यांनी ट्विटर स्पॅम अकाउंट्स असल्याची चिंता व्यक्त करत प्रस्ताव मागे घेतल्यानंतर ट्विटरने मस्क यांना न्यायालयात खेचले. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातील मस्क यांनी मूळ ४४ अब्ज रुपयांचा खरेदी प्रस्ताव ट्विटरपुढे ठेवत खटला संपवण्याची मागणी केली.

ट्विटर डिलसाठी जोरदार हालचाली

वॉल स्ट्रिट जरर्नलच्या एका अहवालानुसार, ट्विटरचे अधिग्रहण करण्यासाठी बँकांनी एलॉन मस्क यांना १३ अब्ज रुपये रोख पाठवण्यास सुरुवात केली आहे. यातून ट्विटर डिल लवकरच होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. खरेदी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून या आठवड्यात व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. ट्विटरला ताब्यात घेण्याची मुदत २८ ऑक्टोबर असल्याचे समजले आहे. डिल न झाल्यास मस्क विरुद्ध न्यायालयात खटला चालेल.

Story img Loader