टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Mask) हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तसेच त्यांच्या नवनवीन आयडियांसाठी ते ओळखले जातात. ऑटो, मोबाइल, स्पेस यानंतर आता एलॉन मस्क शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे अस्तित्व निर्माण करणार आहेत. कारण- मस्क आता शाळा आणि महाविद्यालय उघडण्याच्या तयारीत आहेत. एलॉन मस्क ऑस्टिन टेक्सास येथे नवीन शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा विचार करीत आहेत; ज्यामध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. मस्कने नव्याने स्थापन केलेल्या संस्थेला १०० मिलियन डॉलर ($100) देण्याचे वचन दिले आहे; ज्याचे नाव ‘द फाउंडेशन’ असे आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग व गणित म्हणजेच (STEM) विषयांवर केंद्रित नावीन्यपूर्ण शिक्षण कार्यक्रम राबवणे हे ‘द फाउंडेशन’चे उद्दिष्ट आहे. म्हणजेच ही शाळा विशेषतः STEM वर लक्ष केंद्रित करील आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी प्रशिक्षण देईल.
ब्लूमबर्गने प्राप्त केलेल्या कर फायलिंगनुसार शाळेची सुरुवात सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीसह केली जाणार आहे. या फाईलमध्ये शाळा, ट्युशनमुक्त असण्याच्या महत्त्वाकांक्षेला अधोरेखित करण्यात आले आहे. म्हणजेच ट्युशनसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. जर विद्यार्थ्यांसाठी ट्युशन सुरू केले जात असेल, तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीही तरतूद केली जाईल, असे मस्क यांनी सांगितले आहे. २०१४ मध्ये मस्कने आपल्या मुलांसाठी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘Ad Astra’ नावाची एक छोटी खासगी शाळा सुरू केली होती. Ad Astra ‘योग्यता आणि क्षमता’चे मूल्यांकन करते. याचाच अर्थ असा होतो की, इथे मुलांची कौशल्ये आणि कलागुणांना त्यांच्या गुणांपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते.
हेही वाचा…Best of 2023 : भारतात प्ले स्टोअरवर सर्वांत जास्त लोकप्रिय ठरले ‘हे’ अॅप्स; जाणून घ्या….
एलॉन मस्क एक उद्योजक, स्पेस एक्स व टेस्लाचे सीईओ तर आहेतच; पण दीर्घकाळापासून शैक्षणिक सुधारणांचेही समर्थक आहेत. एलॉन मस्क जी शाळा आणि विद्यापीठाची स्थापना करणार आहेत ते विद्यापीठ शिक्षणाचे भविष्य, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देईल. हा उपक्रम जसजसा आणखीन उलगडत जाईल, तसतसा तो अधिक जास्त लक्ष वेधून घेईल; ज्यामुळे मस्कच्या शैक्षणिक प्रयत्नांच्या शिक्षण आणि नवीन प्रकल्पांवरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ शकते.