दक्षिण कोरियामधील एका अजब प्रकरण सध्या समोर आले आहे. त्यात दक्षिण कोरियामध्ये एक प्रशासकीय अधिकारी असलेल्या रोबोटने चक्क आत्महत्या केली आणि त्याबद्दल चौकशी सुरू आहे. ही घटना उत्तर कोरियातील गुमीमध्ये घडली असून, हा रोबो पायऱ्यांवरून घसरून निष्क्रिय अवस्थेत सापडला असल्याची माहिती ‘टाइम्स नाऊ’च्या अहवालातून मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅलिफोर्नियातील ‘बेअर रोबोटिक्स’ नावाच्या फर्मने तयार केला हा रोबो ऑगस्ट २०२३ पासून कार्यरत होता. प्रशासकीय कामे हाताळणे, इमारतीमध्ये स्वतंत्रपणे फिरणे यांसारखी कामे तो करीत होता. इतकेच नाही तर, तयार केल्या गेलेल्या या रोबोटकडे स्वतःचे कर्मचारी ओळखपत्र म्हणजेच इम्प्लॉयी आयडीदेखील देण्यात आले होते. ज्या व्यक्तीने त्या रोबोला पायऱ्यांवरून खाली कोसळताना पाहिले, त्याच्या म्हणण्यानुसार, तो रोबो गोंधळल्यासारखा दिसत होता आणि खाली पडण्याआधी एकाच जागी गोल गोल फिरत होता.

हेही वाचा : Meta AI in India : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर कसे वापरता येईल मेटा AI? जाणून घ्या…

गुमी सिटी कौन्सिलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार- प्रशासकीय कामे करणारा हा एकमेव रोबोट होता. गेल्या १० महिन्यांमध्ये त्याने त्याची कामे प्रचंड मेहनतीने पार पाडली होती.

रोबोटच्या या निष्क्रिय होण्याबाबत ‘आत्महत्या’ हा शब्द थोडा अतिशयोक्ती करणारा वाटतो खरा; पण मग रोबोट भावनाशून्य असतानाही स्वतःला हानी कसे काय पोहोचवू शकतो हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

निष्क्रिय झालेल्या या रोबोटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असण्याचीही शक्यता आहे. त्यामध्ये नॅव्हिगेशनल एरर, सेन्सर खराब होणे, प्रोग्रामिंगमध्ये बग असणे ही रोबोटच्या गोंधळलेल्या वर्तणुकीमागील कारणे असू शकतात. अशा सर्व शक्यता असल्या तरीही रोबोटच्या ‘आत्महत्येमागचे’ खरे कारण काय आहे याबद्दलचा तपास सुरू आहे. हा रोबोट बनविणारी बेअर रोबोटिक्स कंपनी स्वतः त्या रोबोटचे भाग तपासत आहे.

हेही वाचा : OpenAI च्या सीईओने केले, ‘पुण्याच्या’ प्रफुल्ल धारिवालचे कौतुक! म्हणाले, “GPT-4o हे त्याचे कौशल्य…”

“आम्ही गुमी सिटी कौन्सिलबरोबर मिळून या सर्व प्रकरणाचा तपस करीत असून, भविष्यात या प्रकारची गडबड होऊ नये याकडे लक्ष देऊ”, असे स्पष्टीकरण ‘बेअर रोबोटिक्स’च्या एका प्रवक्त्याने या संपूर्ण प्रकरणासंदर्भात दिले आहे.

या घटनेमुळे मात्र भविष्यात AI सारखे प्रगत तंत्रज्ञान मानवी भावना विकसित करू शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु, असे काही घडू शकते, असे तज्ज्ञांना वाटत असल्याची माहिती ‘टाइम्स नाऊ’च्या एका लेखावरून मिळाली आहे..

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First ever robot suicide reported in south korea can ai develop human emotions check out in marathi dha