Jobs in India: Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. ही कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेत आहे. Apple चा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Foxconn (फॉक्सकॉन) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. Foxconn ने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. यासोबतच या कंपनीने राज्यातील या प्रकल्पात १ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे फॉक्सकॉन कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यभरात तब्बल १ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
Foxconn चे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ही गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी फॉक्सकॉन आणि तेलंगणा सरकारमध्ये हा करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. या करारामुळे १० वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यात १ लाखांपेक्षा अधिक लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. मात्र तैवानची कंपनी तेलंगणा राज्यात किती गुंतवणूक करणार याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, फॉक्सकॉनचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेटअप युनिट तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यास मदत करेल. तसेच राज्यात असे अधिक उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल. या कराराच्या वेळी राज्याचे आयटी व उद्योग मंत्री के.टी. रामाराव तसेच इतर काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केसीआर आणि यंग लिऊ यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात विविधता आणण्याचे महत्व व राज्य सरकारची भूमिका यावर चर्चा केली. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांना आकर्षित करण्यास सरकार यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. फॉक्सकॉनची मोठी गुंतवणूक आणि तेलंगणा राज्यामध्ये १ लाखांपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण करण्याची संधी कौतुकास्पद आहे. तसेच राज्य सरकार फॉक्सकॉन कंपनीला राज्यातील प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉनच्या अध्यक्षांना दिले.