Google Pay introduces convenience fee for bill payments: सध्या सगळीकडेच ऑनलाइन पेमेंट केलं जातं. त्यात अनेक ऑफिस, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन असो किंवा साधं भाजीचं दुकान असो सगळीकडे ऑनलाइन पेमेंट केलं जातं. त्यात आता आपण थेट सगळी बिलंही ऑनलाइन भरतो. आपल्यापैकीच अनेक लोक बिलं भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गूगल पे वापरतात. तुम्हीही बिलं भरायला गूगल पे वापरता का, मग ही बातमी वाचाच. ‘गूगल पे’नं वापरकर्त्यांना मोठा दणका दिला आहे.
घरबसल्या आपल्याला ऑनलाइन झटपट बिल भरता येतंय, त्यामुळे व्यवहार अगदी सोपे झालेत. सुरुवातीला हे पेमेंट अगदी मोफत व्हायचं, पण अलीकडे मात्र सुविधा शुल्क आकारण्यात येत आहेत, त्यामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड बसतोय. यूपीआयपासून बिल पेमेंटपर्यंत विविध सेवा देणाऱ्या अॅप्समुळे आता ग्राहकांवर ओझे वाढू लागलंय. बिल पेमेंटसाठी प्रत्येकाने सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता यामध्ये गूगल पेदेखील मागे राहिलं नाही. कारण आता गूगलने वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केलीय, त्यामुळे आता ग्राहकांनी गूगल पेद्वारे पेमेंट केल्यास त्यांना सेवा शुल्क भरावं लागणार असल्याचं समोर येतंय. UPI प्लॅटफॉर्म GPay कडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आणि अद्याप याविषयी अधिकृत पुष्टी केलेली नाही.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जर तुम्ही बिल पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर ०.५ टक्के ते १ टक्के शुल्क आकारले जाईल. या शुल्काव्यतिरिक्त, तुम्हाला जीएसटीदेखील भरावा लागेल. आतापर्यंत गूगल पेने बिल पेमेंटसाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले नव्हते. सध्या, गूगल पेने सुविधा शुल्काबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात नमूद केलंय की, गेल्या एका वर्षापासून गूगल पे त्यांच्या वापरकर्त्यांकडून मोबाइल शुल्कावर तीन रुपये सुविधा शुल्क आकारत आहे. अहवालात असंही म्हटलंय की, जेव्हा एखाद्या ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला, तेव्हा अॅपने वापरकर्त्याकडून १५ रुपये सुविधा शुल्क आकारले. हे शुल्क अॅपमध्ये डेबिट,क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क या नावाने दाखवले जात आहे, यामध्ये जीएसटीदेखील समाविष्ट आहे.