आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (एडीएनएल) ला प्रवेशयोग्यता सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. या परवान्याद्वारे कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकते. हा दूरसंचार परवाना १० ऑक्टोबरला जारी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या संदर्भात अदानी समूहाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

देशात अलीकडेच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. या स्पेक्ट्रमचा वापर समूहातील व्यावसायिक उपक्रमांसाठी करणार असल्याचे, कंपनीने सांगितले होते. एडीएनएल ने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात ४०० MHz स्पेक्ट्रम २० वर्षांसाठी २१२ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

आणखी वाचा : 5G इंटरनेटबाबत मोठा खुलासा, JIO आणि AIRTEL देत आहेत इतकी डाऊनलोड स्पिड, कुणाची सेवा घ्यायची? तुम्हीच ठरवा

जीओ, एअरटेल कंपन्यांसमोर आव्हान

युनिफाइड परवाना मिळाल्यानंतर, कंपनी भविष्यात तिच्या 5G सेवांचा विस्तार करू शकते. अदानीच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त जीओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान असेल. अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करताना सांगितले होते की, ते त्यांच्या डेटा केंद्रांसह त्यांच्या सुपर अॅप्ससाठी एअरवेव्ह वापरण्याची योजना करत आहेत. हे वीज वितरणापासून विमानतळ आणि बंदरांपर्यंत गॅसच्या किरकोळ विक्रीला समर्थन देईल.

अलीकडच्या काळात अदानी समूहाने पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केला असताना रिलायन्स समूहानेही हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता दूरसंचार क्षेत्रात अदानी समूहाचा प्रवेश ही या दोघांमधील पहिली थेट स्पर्धा आहे.