सोशल मीडियाच्या रोजच्या वापरातील अनेक ॲप्स आपण गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेतो. पण, यात अनेक असे ॲप्स असतात जे युजर्ससाठी घातक असतात. तर आता गुगल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय युजर्सना टार्गेट करणारे काही ॲप्स गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
गुगलने प्ले स्टोअरवरून १७ ॲप्स काढून टाकले आहेत, जे भारतीय वापरकर्त्यांना लोन आणि डेटा हार्वेस्टिंगसह टार्गेट करत होते. संशोधकांनी “स्पायलोन” ॲप्स म्हणून डब केलेले हे ॲप कायदेशीर कर्ज पुरवठादारांवर विश्वास ठेवलेल्या युजर्सचा फायदा घेण्यासाठी डिझाईन केले आहे. या ॲप्सने वापरकर्त्यांना त्यांचा वैयक्तिक डेटा ॲक्सेस करण्याची परवानगी देण्यासाठी सांगून फसवले. एकदा हा ॲप तुम्ही इन्स्टॉल केला की, तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, एसएमएस, फोटो आणि ब्राउझिंग हिस्टरीमधील विशिष्ट माहिती हे हॅकर्स चोरून घेतात. तसेच या डेटाचा वापर नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी आणि युजर्सना जास्त व्याजदरासह कर्जाची परतफेड करण्यासाठी त्रास देण्यासाठी करण्यात येतात.हे ॲप्स भारत, थायलंड, व्हिएतनाम, मेक्सिको, इंडोनेशिया, कोलंबिया, इजिप्त, केनिया, पेरू, फिलीपिन्स, सिंगापूर आणि नायजेरिया आदी देशांमध्ये कार्यरत होते. संशोधकांचा असा विश्वास आहे की, हे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यापूर्वी १२ दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले होते.
हे ॲप्स नेमके कसे काम करतात ?
स्पायलोन ॲप्सने वापरकर्त्यांना डाउनलोड करण्यासाठी प्रेरित केले. एकदा ॲप इन्स्टॉल केल्यावर, या ॲप्सना नकळत मंजूर झालेल्या परमिशन्सद्वारे (permissions) हॅकर्सना वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती मिळते. नंतर या माहितीचा वापर युजर्सना परतफेडीच्या कालावधीवर जास्त व्याजदर देण्यासाठी ब्लॅकमेल केले जाते; ज्यामुळे परतफेड जवळजवळ अशक्य असते. हे ॲप आर्थिक सहाय्याची गरज असलेल्या लोकांना टार्गेट करतात.
तसेच अनेक कर्जदारांवर पुढील पाच दिवसांत त्यांचे कर्ज फेडण्यासाठी हॅकर्सकडून दबाव टाकण्यात येतो, जो अनेक लोकांसाठी अशक्य असतो. याव्यतिरिक्त अहवालात असे दिसून आले आहे की, या कर्जांची खरी वार्षिक किंमत तब्बल १६० टक्क्यांपासून ३४० टक्क्यांपर्यंत आहे. अहवाल सूचित करतात की, या स्पायलोन ॲप्सचा प्रभाव पीडितांसाठी विनाशकारी ठरला आहे. काहींनी त्यांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या प्रचंड दबावामुळे स्वतःचा जीव घेण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे. हे ॲप्स फेक आहेत हे तेव्हा स्पष्ट झाले, जेव्हा कर्जाची परतफेड करणार नाही असे सांगणाऱ्या युजर्सना त्यांची पर्सनल माहिती देण्यास भाग पाडले.
हेही वाचा…गुगल अकाउंट डिलीट कसे करायचे असा प्रश्न पडलाय? या सोप्या स्टेप्स लक्षात ठेवा, पाहा
गुगलने असे म्हटले आहे की, वापरकर्त्यांना अशा ॲप्सपासून संरक्षण करण्यासाठी गुगल नेहमीच प्रयत्नशील राहील आणि गेल्या वर्षभरात प्ले स्टोअरवरून २०० हून अधिक स्पायलोन ॲप्स काढून टाकले आहेत. तसेच आता पुन्हा १७ ॲप्ससुद्धा काढून टाकले आहेत आणि युजर्सच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.