गुगल आणि भारती एअरटेलने स्वस्त स्मार्टफोन आणि ५ जी सेवा देण्यासाठी हातमिळवणी केली आहे. रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल भारतीय दूरसंचार कंपनी भारती एअरटेलम ध्ये१०० कोटी डॉलर्सची (रु.७,५१० कोटी) गुंतवणूक करणार आहे. यात गुगल भारती एअरटेलमध्ये ७० कोटी डॉलर्सची (५२५७ कोटी रुपये) गुंतवणूक करून समभाग खरेदी करेल. एकत्रितपणे स्वस्त फोन विकसित करेल आणि ५ जीसाठी संशोधन करेल. फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल भारती एअरटेलमधील १.२८ टक्के समभाग ७३४ रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करेल. याशिवाय, उर्वरित ३०० कोटी डॉलर्स (रु. २२५३ हजार कोटी) अनेक वर्षांसाठी व्यावसायिक कराराच्या स्वरूपात गुंतवले जातील.
एअरटेलने जारी केलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन गुगलसोबत भागीदारी अंतर्गत सर्व किंमतींमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, दोन्ही कंपन्या भारताच्या स्थानिक परिस्थितीनुसार 5G नेटवर्कवर एकत्र काम करतील. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे देशातील व्यवसायासाठी क्लाउड इकोसिस्टमला प्रोत्साहन देतील.
गुगल आणि एअरटेल यांच्यातील भागीदारीचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. आज इंट्रा-डे मध्ये एनएसईवर त्याच्या किमती रु. ७०६.९५ वरून ७२१.९५ वर पोहोचल्या आहेत. यावर्षी आतापर्यंत त्याच्या किमतीत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला त्याचा एक शेअर ६९१.३० रुपये होता. एका वर्षाच्या कालावधीत २८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.