एखाद्या अज्ञात ठिकाणी पहिल्यांदा जाताना आपण सगळेच सध्या ‘गूगल मॅप’चा (Google Map) उपयोग करतो. आपण सहसा पिकनिकला जाताना एकाच गाडीतून जातो किंवा मित्र-मैत्रिणींच्या वैयक्तिक गाड्या असतील, तर थेट पिकनिक स्पॉटवर भेटायचे ठरवतो. पण, यात काही जण उशिरा येतात, तर काही लवकर येतात. मग तू कुठे थांबला आहेस? तिथे मी कसं येऊ, असे प्रश्न कॉलवर मित्र-मैत्रिणींशी सुरू होतात. हे सर्व प्रश्न-उपप्रश्न आणि त्यांची उत्तरे यांच्या देवघेवीत कित्येकदा पिकनिकच्या मजेचा महत्त्वपूर्ण वेळ वाया जातो. पण, आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण- गूगल मॅप एक नवीन मल्टी-कार ‘नेव्हिगेशन फीचर’ आणण्याची योजना आखत आहे. हे नवीन फीचर वेगवेगळ्या ठिकाणांवरून प्रवास सुरू करणाऱ्या ग्रुपसाठी सोईस्कर ठरणार आहे. पण, हे फीचर नक्की कसे काम करणार ते या लेखातून आपण सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ जून रोजी गूगलने US पेटंट व ट्रेडमार्क कार्यालयाकडे (@xleaks7 द्वारे) दाखल केलेल्या पेटंटनुसार, या फीचरवर सध्या काम सुरू केले आहे; जे वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवास सुरू करणाऱ्या मित्र -मैत्रिणींना विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेत वेळेत पोहोचण्यासाठी मदत वा मार्गदर्शन करील. तसेच तुम्ही कोणत्या वेगाने गाडी चालवावी याबाबतही हे अॅप तुम्हाला वेळोवेळी सूचना देईल. पण, ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, नवीन फीचरमध्ये कॅलेंडर शेड्युल व मेसेजमध्ये प्रवासात कुठे जायचं आहे हे निश्चित करणे अपेक्षित आहे. तसेच एकापेक्षा अधिक वापरकर्त्यांना गूगल मॅप वापरायचे असल्यास तुम्ही त्यांना इन्व्हिटेशन पाठवू शकता.

हेही वाचा…आदित्य-L1 ची पहिली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण; कसा होता प्रवास, किती दिवस लागले? जाणून घ्या सविस्तर…

तर, नेव्हिगेशन सेवा मॅपवर प्रवास करणाऱ्या सर्व वापरकर्त्यांची ठिकाणे, इतर प्रवासी कोणत्या मार्गावरून येत आहेत हे दाखवू शकेल. त्यामुळे ते एकमेकांची प्रतीक्षा कुठे करू शकतील अशी ठिकाणे ओळखू किंवा सुचवूदेखील शकतात, Google Maps ग्रुपमधील एक सदस्य गंतव्य स्थानावर पोहोचेल आणि मागे राहिलेल्या प्रवाशांना ट्रॅक करीत रिअल-टाइम माहितीही देईल.

हे फीचर अपघात, ट्रॅफिक जाम यांसारख्या संभाव्य गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने मदत करील आणि ग्रुपमधील इतर सदस्यांना पोहोचायला उशीर झाल्यास पर्यायी मार्ग सुचविण्यासही मार्गदर्शन करू शकते. ग्रुपमधील एखाद्या वाहनाने वळसा घेतल्यास ते सूचनादेखील पाठवू शकते. तसेच खास गोष्ट अशी की, हे फीचर केवळ स्टॅण्डअलोन म्हणून कार्यरत नसून, वाहनाच्या इन्फोटेन्मेंट सिस्टीमशी USB किंवा Bluetooth द्वारे कनेक्ट केलेल्या डिव्हायसेसवरही कार्य करील, असे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google maps introduce a multi car navigation feature help to bring enhanced functionality for those travelling in groups too asp
Show comments