प्रवास करणाऱ्यांसाठी गूगल कंपनीचे ‘गूगल मॅप’ हे ॲप नेहमीच फायदेशीर ठरते. हे गूगल मॅप अनोळखी शहरात पहिल्यांदा गेल्यावर आणि विविध कंपनीच्या कॅब बुक केल्यावर ड्रायव्हरलासुद्धा तुमच्या अचूक पत्त्यावर पोहोचण्यासाठी मदत करते. आता गूगल मॅप वापरकर्त्यांसाठी एक खास फीचर घेऊन येत आहे. या खास फीचरच्या मदतीने तुम्ही प्रवासादरम्यान गाडीतील इंधनाची बचत करू शकणार आहात.
गूगल मॅपच्या या नवीन फीचरचे नाव ‘फ्युएल सेव्हिंग’ असे आहे. हे फीचर इनेबल केल्यानंतर गूगल मॅप वापरकर्त्याचा मार्ग, ट्रॅफिक, रोडची परिस्थिती व अंतर (किती किलोमीटर) कॅलक्युलेट करेल. त्यानंतर अॅप एक रूट दाखवेल; ज्यामुळे जास्तीत जास्त इंधनाची बचत होईल. त्यामध्ये अॅडिशनल रुटचे सजेशनदेखील दिले जाईल. हे फीचर सुरुवातीला यूएस, कॅनडा व युरोपमध्ये उपलब्ध होते; जे आता भारतातसुद्धा लाँच करण्यात आले आहे.
गूगल मॅपमध्ये फ्युएल सेव्हिंग हे फीचर ॲक्टिव्हेट करण्याच्या स्टेप्स पाहू :
१. सगळ्यात आधी तुमच्या मोबाइलमधील गूगल मॅप (Google Maps) या ॲपवर जा.
२. तुमचा प्रोफाइल फोटो निवडा.
३. सेटिंग्जवर जाऊन नेव्हिगेटवर (Navigate) क्लिक करा.
४. त्यानंतर स्क्रोल करून Route ऑप्शनवर जा.
५. इंधन कार्यक्षम मार्ग म्हणजेच ‘Prefer fuel-Efficient Routes’ हा पर्याय ऑन करा.
६. त्यानंतर तुमच्या गाडीचा इंजिन प्रकार निवडा.
अशा प्रकारे तुमचे फ्युएल सेव्हिंग हे फीचर ॲक्टिव्हेट होईल.
फ्युएल सेव्हिंग म्हणजे रस्त्याची परिस्थिती आणि ट्रॅफिक पाहून प्रवासादरम्यान एका मार्गावर किती इंधन वापरले जाईल यांचा अंदाज गूगल मॅप लावू शकणार आहे. त्यानंतर वापरकर्त्यांनी ठरवायचे की त्यांना कोणता मार्ग निवडायचा आहे. इंधन बचत (फ्युएल सेव्हिंग) हे फीचर वापरण्याअगोदर तुमच्या वाहनाचा इंजिन प्रकार निवडताना, त्यात अंतर्गत इंजिन आहे की नाही हे पाहून तसे पेट्रोल किंवा डिझेल यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. वापरकर्त्यांनी हायब्रिड किंवा प्लग-इन हायब्रिड वाहनांसाठी प्रामुख्याने हायब्रिड हा पर्याय निवडायचा. जर तुमचे वाहन ईव्ही किंवा प्लग-इन हायब्रिड असेल, तर ते बहुतेक विजेवर अवलंबून असेल. त्यामुळे तेव्हा इलेक्ट्रिक हा पर्याय तुम्ही निवडा. अशा प्रकारे गूगल मॅपचा उपयोग करून, तुम्ही प्रवासादरम्यान इंधनाची बचत करू शकणार आहात.