गूगल ड्राइव्ह ही गूगलची एक क्लाऊड सेवा आहे. आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून ही सेवा सहज उपलब्ध होऊ शकते. तसेच युजर्स गूगल ड्राइव्ह (Google Drive) हे स्वतंत्र ॲप डाऊनलोड करून, मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण या ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवणे, तसेच या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर शेअर करणे या बाबी अगदी सहजपणे करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अटॅचमेंट्स आपण थेट गूगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो.
तर जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गूगल ड्राइव्हवरील स्टोरेज समस्यांपैकी एक म्हणजे आपण एखादा व्हिडीओ डाऊनलोड केला की, तो अपलोड होण्यास वेळ लागतो किंवा एखादा व्हिडीओ प्ले करताना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. तसेच दुसरी समस्या म्हणजे एखादी फाईल गूगल ड्राइव्हमध्ये शोधणे अनेकदा कठीण जाते. या दोन्ही समस्यांसाठी गूगल ड्राइव्ह खास अपडेट घेऊन येत आहे. त्यामुळे व्हिडीओ आणि सर्चबाबतचा अनुभव सुधारण्यासाठी काही फीचर्स उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा…गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
गूगल टेक जायंट iOS डिव्हायसेसवरील सर्च (Search) करण्याबाबतचा अनुभव सुधारत आहे. Android ॲपसाठी हे अपडेट काही दिवसांनंतर उपलब्ध होईल. गूगल ड्राइव्हच्या सर्चमध्ये टाईप (Type), पीपल (People) व मॉडिफाइड (Modified), असे तीन नवीन फिल्टर दिले जाणार आहेत. ‘पीपल’ हा पर्याय तुमच्या संपर्काच्या फाइल्स प्रदर्शित करील. ‘टाईप’ तुम्हाला एखादी ऑडिओ, व्हिडीओची फाईल क्रमवार लावून देईल आणि मॉडिफाइड (Modified) तुम्हाला तारखेनुसार यादी तयार करण्यास मदत करील. नवीन फीचर्स सध्या वर्कस्पेस ग्राहक, (Workspace Customers), वर्कस्पेस वैयक्तिक सदस्य (Workspace Individual subscribers) व वैयक्तिक गूगल खाती असणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहेत.
एका ब्लॉग पोस्टमध्ये गूगलने सांगितले की, HTTP वर डायनॅमिक ॲडॉप्टिव्ह स्ट्रीमिंगसाठी DASH जोडत आहे. त्यामुळे नेटवर्कच्या गुणवत्तेनुसार व्हिडीओ रिझोल्युशन स्वयंचलितपणे बदलते. गूगल ड्राइव्हवर एखादा व्हिडीओ जेव्हा आपण ‘प्ले’ करतो, तेव्हा व्हिडीओ लोड (Load ) होण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु, या अपडेटनंतर आता व्हिडीओ लोड होण्याच्या वेळेत सुधारणा होईल आणि व्हिडीओ जास्त वेगाने ‘प्ले’ होईल. तुम्ही गूगलवर एखादा नवीन व्हिडीओ अपलोड कराल, तेव्हा त्या व्हिडीओवर DASH स्वयंचलितपणे लागू केले जाईल. हे अपडेट्स या वर्षाच्या अखेरीस लागू करण्यात येतील. थोडक्यात गूगल लवकरच ड्राइव्ह वापरणाऱ्या युजर्ससाठी ही खास फीचर्स घेऊन येणार आहे.