Google Pixel 8, Pixel 8 Pro Specification Features in Marathi: गुगल या दिग्गज टेक कंपनीचा काल मेड बाय गुगल २०२३ हार्डवेअर लॉन्च इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये गुगलने आपली नवीन सिरीज लॉन्च केली आहे. कंपनीने गुगल पिक्सेल ८ सिरीज लॉन्च केली. ज्यात पिक्सेल आणि पिक्सेल ८ प्रो या दोन फोन्सचा समावेश आहे. गुगलच्या या दोन्ही फोन्समध्ये Tensor G3 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आऊट ऑफ बॉक्सवर चालतो. पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो दोन्ही फोन्स गुगलच्या AI सेवांमध्ये म्हणजेच फोटो अनब्लर आणि लाइव्ह ट्रान्सलेटला सपोर्ट करतात. गुगल सात वर्षांचे सॉफ्टवेअर सपोर्ट देखील या फोन्समध्ये देणार आहे.
गुगल पिक्सेल ८ आणि गुगल पिक्सेल ८ प्रो: फीचर्स
पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. जो अँड्रॉइड १४ वर आऊट ऑफ बॉक्सवर चालतो. पिक्सेल ८ मध्ये वापरकर्त्यांना ६.२ इंचाचा फुल एचडी + OLED डिस्प्ले मिळते. तर पिक्सेल ८ प्रो मध्ये ६.७ इंचाचा क्वाड HD डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. पिक्सेल ८ मध्ये ८ जीबी रॅम आणि पिक्सेल ८ प्रो १२ जीबी रॅम देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो या दोन्ही फोन्समध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.68 अपर्चर असणारे सॅमसंग GN2 सेन्सर देण्यात आला आहे. पिक्सेल ८ मध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा कॅमेरा, सोनीचा IMX386 सेन्सर मिळणार आहे. दुसरीकडे पिक्सेल ८ प्रो मध्ये वापरकर्त्यांना सोनीच्या IMX787 सेन्सरसह ६४ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. पिक्सेल ८ प्रो मध्ये सॅमसंग GM5 सेन्सरसह ४८ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओसाठी दोन्ही फोनमध्ये ११ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो मध्ये २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय , ५जी, ४जी एलटीई, ब्लूटूथ ५.३ , जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट असे फिचर देण्यात आले आहेत. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळणार आहे.पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो मध्ये अनुक्रमे २७ आणि ३० W वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या दोन्ही फोन्समध्ये ४५७५ आणि ५०५० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. हे हॅंडसेट्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात असा गुगलचे म्हणणे आहे. पिक्सेल ८ प्रो हा ३० मिनिटांमध्ये ५० टक्के तर १०० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होतो. मात्र रेगुलर मॉडेल असणाऱ्या पिक्सेल ८ मध्ये ५० टक्के चार्ज होण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागू शकतो.
भारतातील किंमत आणि उपलब्धता
भारतात पिक्सेल ८ ची किंमत ७५,९९९ रुपये असणार आहे. हा फोन १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. खरेदीदार हा स्मार्टफोन Hazel, Obsidian आणि Rose या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. दुसरीकडे, पिक्सेल ८ प्रो ची किंमत भारतात १,०६ ९९९ रुपये असणार आहे. हा फोन देखील १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन खरेदीदार Bay, Obsidian आणि Porcelain या रंगांमध्ये खरेदी करू शकता. खरेदीदार हे दोन्ही फोन्स फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करू शकणार आहे. कालपासून या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरपासून सुरू झाली आहे.
कंपनीने भारतात या दोन्ही फोनसाठी काही मर्यादित ऑफर्सची घोषणा केली आहे. पिक्सेल ८ फोनवर बँका ८ हजार रुपयांपर्यंत ऑफर देत आहेत. तर निवडक बँका या फोनवर ३ हजारांची एक्सचेंज ऑफर देत आहे. पिक्सेल ८ प्रो या फोनवर ९ हजारांपर्यंत ऑफर्स मिळणार आहेत. तसेच काही निवडक बँका ४ हजारांची एक्सचेंज ऑफर देणार आहेत.