Google Will Delete Gmail Account: गूगलच्या नव्या कारवाईवर,या वर्षी 1 डिसेंबरपासून काही ठराविक जीमेल खाती बंद करण्यात येणार असल्याचे समजतेय. आपल्या अब्जावधी वापरकर्त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, कंपनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. दोन वर्षांहुन अधिक काळ जर एखाद्या जीमेल अकाउंटवरून एकही ऍक्टिव्हिटी केलेली नसेल तर गूगलतर्फे ते खाते कोणतीही सूचना न देता थेट हटवण्यात येणार आहे. या खात्यावरील संपूर्ण डेटा अगदी तुमच्या ड्राइव्हमधील फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स सगळं काही यामुळे तुम्ही कायमचं गमावून बसू शकता.
गूगलने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीत साइन इन केले नसेल किंवा तुमचे खाते वापरले नसेल तर गूगल तुमचे खाते हटवणार आहे. हे धोरण तुमच्या वैयक्तिक गूगल खात्यावर लागू होते. तुमच्या कार्यालय, शाळा किंवा इतर संस्थेद्वारे तुमच्यासाठी सेट केलेल्या कोणत्याही गूगल खात्याला हा नियम लागू होत नाही. अशाप्रकारचे निष्क्रिय खाते हे घोटाळेबाज व ऑनलाईन स्कॅमर्ससाठी तयार संधी असते. या अकाउंट्सवर अन्य युजर्सची फसवणूक तुमच्या नावे होऊ नये यासाठी गूगलने अशी खाती हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र आपल्याला लगेचच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. गूगलतर्फे जर तुमचे खाते हटवण्यात येणार असेल तर त्यापूर्वी तुम्हाला सूचित केले जाईल. तुम्हाला जर अशा प्रकारची सूचना प्राप्त झाली किंवा तुमच्याकडे असे खाते आहे याची तुम्हाला अगोदरच कल्पना असेल तर आपण खालील मार्गांनी आपले अकाउंट सक्रिय ठेवू शकता.
हे ही वाचा<<Apple Diwali Sale: iPhone 15, iPad, MacBook वर मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा
गूगलला तुमचे खाते हटवण्यापासून कसे रोखायचे?
- दर दोन वर्षांनी एकदा तरी तुमच्या Gmail खात्यात साइन इन करा. तुमचे खाते सक्रिय राहील याची खात्री करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
- ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी तुमचे Gmail खाते वापरा. जरी तुम्ही दररोज Gmail वापरत नसला तरीही, काही दिवसांच्या अंतराने एखादा तरी मेल या अकाउंटचा वापर करून पाठवा व प्राप्त करा.
- हे अकाउंट वापरून YouTube व्हिडिओ पाहणे हा तर सर्वात सोपा पर्याय आहे.
- Google ड्राइव्ह वापरा
- Google सर्च वापरा
- तृतीय-पक्ष अॅप किंवा सेवेमध्ये साइन इन करण्यासाठी या अकाउंटमधून साइन इन करा