एखादी माहिती शोधण्यासाठी आपण सगळेच सर्च इंजिन गूगलचा वापर करतो. गूगल कंपनीदेखील युजर्ससाठी विविध सोशल मीडिया ॲप्स उपलब्ध करून देत असते. आता गूगल कंपनीने त्यांचे एक लोकप्रिय ॲप बंद करण्याची घोषणा केली आहे. गूगल त्याच्या गूगल प्ले मूव्हीज आणि टीव्हीला (Google Play Movies & TV) निरोप देणार आहेत.
त्यामुळे आता युजर्स येत्या काही दिवसांत हे ॲप वापरू शकणार नाहीत. गूगलने अॅण्ड्रॉईड टीव्ही आणि आयओएसवरून हे ॲप काढून टाकले आहे. तसेच युजर्ससाठी मनोरंजनाचा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी गूगलने एक खास पर्यायसुद्धा दिला आहे. गूगल प्ले मूव्हीज आणि टीव्हीच्या जागी चित्रपट आणि शो पाहण्याचा पर्याय म्हणून ‘शॉप टॅब’ विकसित करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
9to5Google च्या अहवालानुसार असे म्हटले आहे की, गूगल प्ले मूव्हीज आणि टीव्ही शॉप टॅबमध्ये बदलला जाईल. सब्स्क्रिप्शनद्वारे चित्रपट आणि शो खरेदी करण्याचा पर्याय म्हणून शॉप टॅब विकसित करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. १७ जानेवारीपासून युजर्सना त्यांच्या आवडीचे चित्रपट आणि शो बघण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्युब ॲपमध्ये एक शॉप टॅब दिसेल. अॅण्ड्रॉईड टीव्हीवर चित्रपट आणि शो पाहणाऱ्यांसाठी हा पर्याय वापरणे अगदीच सोपे जाईल.
हेही वाचा…भारतीय युजर्सना टार्गेट करणाऱ्या ‘या’ १७ ॲप्सवर गुगल घालणार बंदी!
गूगल कंपनीकडून वेळोवेळी जुन्या सर्व्हिस व ॲप्स बंद केले जातात. कारण- या ॲप्सचा युजर्सकडून जास्त वापर होत नाही आणि त्यामुळे कंपनीचे नुकसान होते. तसेच या सगळ्यावर गुूलची एक मोठी टीम लक्ष ठेवून असते. अशा परिस्थितीत गूगल जुनी सेवा किंवा ॲप बंद करून सध्या मागणीत असलेली सेवा किंवा ॲप सुरू करण्याचा प्रयत्न करीत असते. आजच्या काळात एआय जनरेट केलेल्या टूल्सची मागणी आहे. अशा परिस्थितीत गूगल बोर्ड आणि इतर एआय टूल्सवर काम करते आहे. तर आता गूगलने त्यांचे एक लोकप्रिय अॅप गूगल प्ले मुव्हीज आणि टीव्ही बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता युजर्स पुढील महिन्यापासून हे अॅप वापरू शकणार नाहीत.