सध्याचं काळ हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. प्रत्येकजण मनोरंजनासह महत्वपुर्ण माहिती मिळवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. मात्र, हे करत असताना इंटरनेटचा वापर करावा लागतो. त्यामुळे सोशल मीडियावर काही शोधणं असो वा पाहणं असो ते सर्वसामान्यासाठी थोडं खर्चीक असतं. पण आता लवकरच आपण इंटरनेटशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरती काहीही पाहू शकणार आहोत.
आणखी वाचा- REAL ME 10 झाला लाँच; ५० एमपी कॅमेरा, 33 वॉट चार्जिंगसह मिळतंय बरंच काही, जाणून घ्या किंमत
कारण यासाठी सरकार एका तंत्रावर काम करत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण इंटरनेट कनेक्शनशिवाय मोबाइलवर मल्टीमीडिया सामग्री डाउनलोड करु शकणार आहे. या तंत्रज्ञानाचं नाव ‘डीटूएम’ डायरेक्ट टू मोबाईल (D2M) असं आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यामागे सरकारचे मोठे धोरण आहे.
कारण सध्या इंटरनेटच्या अतिवापरामुळे सोशल मीडियावर अनेक अफवाना उधाण येतं त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उद्धवतो, याच खोट्या बातम्यांसह अफवांवर मात करत नागरिकांपर्यंत खरी आणि महत्त्वाची माहिती देण्यासाठी, आपत्कालीन अलर्ट जारी करण्यासाठी सराकर ‘डीटूएम’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. तंत्रज्ञान विभागाने अभ्यास करुन स्पेक्ट्रम बँड शोधला आला आहे, जो स्मार्टफोनवर थेट ब्रॉडकास्ट सेवा देण्यास मदत करणार आहे. यासाठी सप्टेंबर महिन्यात आयआयटी कानपूरने या ‘डीटूएम’ तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेची चाचणी घेण्यासाठी प्रसार भारतीसोबत काम केले. त्यानंतर ही प्रणाली विकसित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
नेमकं काय आहे ‘डीटूएम’?
डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच ‘डीटूएम’ (D2M) तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू असून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागू शकतात. हे नवीन तंत्रज्ञान एफएम (FM) रेडिओसारखे काम करते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍक्सेस करण्यासाठी रिसीव्हरचा वापर करेल. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्म मोबाईल फोनवर मल्टीमीडिया सामग्री प्रदान करण्यासाठी या (D2M) तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. प्रसार भारती सध्या टीव्ही प्रसारणासाठी 526-582 MHz बँड वापरते. हा बँड मोबाईल आणि ब्रॉडकास्ट अशा दोन्ही सेवांसाठी काम करणार आहे.
इंटरनेटशिवाय पाहू शकाल सर्वकाही –
या तंत्रज्ञानाच्या मदतीने, स्मार्टफोन वापरणारे आपला मोबाइल डेटा न वापरता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रम पाहू शकणार आहेत. यामुळे मोबाईल डेटावरील ग्राहकांचा खर्च कमी होईलच शिवाय ग्रामीण भागातमध्ये ज्या ठिकाणी इंटरनेटच्या रेंज बाबतची समस्या असते. त्यांनाही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रम विना अडथळा पाहता येणार आहेत. तसंच ‘डीटूएम’ तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासात मदत होईल तर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि विविध शेती पद्धतींची माहिती इंटरनेटशिवाय मिळू शकणार आहे. त्यामुळे ‘डीटूएम’तंत्रज्ञान कधी येईल याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.