सध्या सर्वत्र अनेक दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करताना दिसत आहेत. जागतिक आर्थिक मंदी आणि कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कंपन्या ही पावले उचलताना दिसत आहे. यामध्ये Amazon, google ,meta यासारख्या अनेक दिग्गज टेक कंपन्यांचा समावेश आहे. यामध्येच IT कंपनी असणारी HCLTech आपल्या कंपनीतील ८५ टक्के कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी पगारामध्ये अतिरिक्त रक्कम (variable pay ) देणार आहे.
गुरुवारी झालेल्या मीटिंगमध्ये HCLTech चे चीफ पीपल ऑफिसर (CPO) राम सुंदराजन यांनी सांगितले, ”आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कंपनी ८५ टक्के कर्मचाऱ्यांना पगारामध्ये अतिरिक्त रक्कम देणार आहे.” ही अतिरिक्त रक्कम मागील तिमाही प्रमाणेच असणार आहे. यामध्ये ८५ टक्के कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडे ने दिले आहे.
वेतनाच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात. वेतन हा प्रत्येकाच्या मनात सतत सुरु असणारा प्रश्न आहे असे मला वाटते. आम्ही आमच्या व्हेरिएबल पे च्या प्लॅनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही आहोत. या तिमाहीमध्ये आमच्या कंपनीचे ८५ टक्के कर्मचारी या योजनेमध्ये समावेशित असतील असे चीफ पीपल ऑफिसर (CPO) राम सुंदराजन यांनी सांगितले. पगारामध्ये अतिरिक्त रक्कम देणे हा कर्मचारी भरपाईचा एक भाग आहे जो कंपनीच्या कामगिरीवर तसेच वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असतो.
गुरुवारी HCLtech या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात १०.८० टक्क्यांनी ३,९८३ कोटी रुपयांची वार्षिक वाढ नोंदविली. जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये ३,५९३ कोटी रुपयांची होती. तसेच कंपनीने या तिमाहीमध्ये निव्वळ विक्रीमध्ये १७.७० टक्केवारीनुसार २६,०६० कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे.