आजच्या काळामध्ये डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपली बरीचशी कामे ही ऑनलाईन, डिजिटल पद्धतीनेच होत असतात. मात्र या सुविधेमुळे जसे फायदे होतात तसे काही तोटे होऊ शकतात. सध्याच्या काळामध्ये ऑनलाइन घोटाळे जगभरातील एक चिंतेचा विषय बनला आहे. या घटना भारतात देखील घडतात. गेल्या काही महिन्यांमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
अशा ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमुळे पिडीतांवर आर्थिक आणि भावनिक परिणाम होऊ शकतात. ज्यामुळे त्यांनी त्वरित तक्रार करणे महत्वाचे ठरते. कोणताही फसवणूक झालेला व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊ शकतो किंवा सायबर गुन्ह्यांचा रिपोर्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टलकडे जाऊ शकतात. शक्यतो २४ तासांच्या आतच आपली तक्रार नोंदवावी . जेणेकरून पोलीस त्वरित त्या गोष्टी ट्रॅक करू शकतील. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
जर का तुम्हालाही ऑनलाईन घोटाळ्याची तक्रार करायची असल्यास नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर जाऊन कशी तक्रार करायची यासाठीच्या सोप्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.
नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टल
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल हा एक सरकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश सायबर गुन्ह्यातील पीडितांना ऑनलाईन तक्रारी करण्यास मदत करणे हे आहे. या पोर्टलवर सव प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची नोंद घेतली जाते. हे पोर्टल विशेषतः महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करते. हे चोवीस तास कार्यरत आहे मदतीसाठी एक समर्पित हेल्पलाइन क्रमांक (१९३०) उपलब्ध आहे.
नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टलवर तक्रार कशी करायची ?
१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचे वेब ब्राऊझर ओपन करावे. त्यानंतर पोर्टलच्या https://cybercrime.gov.in वेबपेजवर नेव्हीगेट करावे.
२. होम पेजवर जाऊन File a complaint वर क्लीक करावे.
३. पुढील पेजवर नियम आणि अटी वाचून त्या स्वीकाराव्यात.
४. ‘Report other cybercrime’ button वर क्लिक करावे.
५. त्यानंतर citizen login हा पर्याय निवडा. तसेच नाव,ईमेल आणि फोन नंबरसह तुमचे डिटेल्स प्रविष्ट करा.
६. तुमच्या नोंदणी केलेल्या फोन नंबरला पाठवण्यात आलेला ओटीपी एंटर करावा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
७. त्याच्या पुढील पेजवर तुम्ही ज्या सायबर गुन्ह्याची तक्रार करू इच्छिता त्याबद्दलचे डिटेल्स भरा. हा फॉर्म चार विभागांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक विभागात योग्य ते डिटेल्स भरावेत.
८. माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
९. तुमच्या घटनेसंदभातील तपशील आणि त्याच्याशी संबंधित पुरावे तिथे भरावेत. जसे की स्क्रीनशॉट्स किंवा फाईल्स. एकदा का माहिती भरली की त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
१०. पुढील पेजवर पलब्ध असल्यास कथित संशयिताची माहिती आवश्यक आहे. संशयित व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास डिटेल्स भरा.
११. तुम्ही भरलेली माहिती व्हेरिफाय करून सबमिट बटणावर क्लिक करावे.
१२, तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज प्राप्त होईल. त्यात तुमची तक्रार स्वीकारली असल्याचे सांगण्यात येईल. त्यासह एक ईमेल ज्यात तक्रार आयडी आणि अन्य डिटेल्स असतील.
ऑनलाईन व्यवहार, लॉटरी स्कॅम, एटीएम स्कॅम, बनावट कॉल किंवा इंटरनेट बँकिंगशी संबंधित सायबर फसवणूक तक्रार दाखल करताना तुम्हाला फसवणूक झाल्याचे काही पुरावे जोडावे लागतील. बँक स्टेटमेंट, पत्ता आणि आयडी पुरावा यासारखे समर्थन पुरावे आणि तुम्हाला प्राप्त झालेले कोणतेही संशयास्पद मेसेज किंवा ईमेल देखील समाविष्ट केले पाहिजेत.