मोबाईल आणि इंटरनेटमुळे कोणतेही काम एका क्लिकवर करणे सहज शक्य झाले आहे. अनेक कामांसाठी आपण बँक खाते, वैयक्तिक डेटा अशी माहिती बऱ्याच वेबसाईट्सशी शेअर करतो. पण हे वेबसाईट्स खरे आहेत की बनावट (फेक) आहेत हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे अनेकजण सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी सीइआरटी (कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने फेक वेबसाईट्स कशा ओळखायच्या याचे काही मार्ग सांगितले आहेत.
डिजिटायजेशनमुळे सर्व व्यवहार ऑनलाईन केले जात आहेत. ऑनलाइन पेमेंट करताना त्या वेबसाईटला आपली सर्व माहिती शेअर करणे गरजेचे असते. अशात ती वेबसाईट विश्वासार्ह आहे की नाही हे तपासण्याचा कोणताही मार्ग नसतो. याचाच फायदा घेऊन अकाउंट डिटेल्स, डेटा चोरी करणे असे प्रकार घडतात. यांमुळे भारतात सायबर क्राईमचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. या जाळ्यात तुम्हालाही अडकवले जाऊ शकते, यापासून सावध राहण्यासाठी तुम्ही वापरत असलेली वेबसाईट विश्वासार्ह आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. हे कसे तपासता येईल जाणून घ्या.
आणखी वाचा : Spam Calls : स्पॅम कॉल्सवरून होतेय अनेकांची आर्थिक फसवणूक; सोपी ट्रिक वापरुन मिळवा यापासून कायमची सुटका
फेक वेबसाईट ओळखण्यासाठी सीईआरटीने सांगितलेले पाच मार्ग
- कोणत्याही वेबसाईटवरून ब्राऊजिंग करताना, शॉपिंग किंवा रजिस्ट्रेशन करताना त्या वेबसाईटचा युआरएल नेहमी तपासा. यासाठी तुम्ही सर्च इंजिन मध्ये त्या वेबसाईटचे रिव्ह्यू देखील तपासू शकता.
- वेबसाईटच्या कनेक्शनचा प्रकार तपासा, तो नेहमी HTTPS असावा, फक्त HTTP असल्यास याचा अर्थ त्या वेबसाईटचे कनेक्शन सुरक्षित नाही.
- कोणत्याही वेबसाईटवर माहिती शेअर करण्यापुर्वी त्याचे एसएसएल सर्टीफीकेशन तपासा. हे होमपेज, लॉगइन पेज, चेकआऊट पेजवर उपलब्ध असते.
- जर एखाद्या वेबसाईटवर चुकीची वाक्य लिहलेली असतील म्हणजे व्याकरणामध्ये चुका असतील किंवा स्पेलिंगमध्ये चुका असतील, तर याचा अर्थ ती वेबसाईट विश्वासार्ह नाही.
- जर तुम्ही निवडलेल्या वेबसाईटवर अनेक जाहिराती दिसत असतील आणि त्यामध्ये आपोआप ऑडिओ प्ले होत असेल तर याचा अर्थ ती वेबसाईट विश्वासार्ह नाही.