मोबाईल हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे उपकरण झाले आहे. आपण अनेक कामं मोबाईलमुळे सहजरित्या करू शकतो. आपल्या बरोबर सतत बाळगणाऱ्या या उपकरणामध्ये कधीकधी सतत काहीतरी अडचणी येत राहतात, ज्यामुळे त्यावर कोणतेही काम करणे कठीण होते. मोबाईल डेटा न वापरता येणे, चार्जिंगची समस्या अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. मोबाईल वापरताना अनेकांना येणाऱ्या या समस्या कोणत्या आहेत आणि त्यांपासून कशी सुटका मिळवता येईल जाणून घ्या.
चार्जिंग हळू होण्याची समस्या
फोन जोपर्यंत नवीन असतो, तोपर्यंत त्याचे चार्जिंग फास्ट होते पण नंतर चार्जिंग हळू होत असल्याचे तुम्हाला जाणवले असेल. काही फोनमध्ये तर चार्जिंग इतके हळू होते की नेहमीपेक्षा दुप्पट वेळ फोन चार्जिंगला लावावा लागतो. चार्जिंगची वायर खराब झाली असल्यास अशी समस्या उद्भवू शकते. तसेच फोन वापरत असताना चार्जिंगला लावला, त्यावर व्हिडीओ स्ट्रीमिंग किंवा गेम खेळणे सुरू असेल तर चार्जिंग हळू होऊ शकते. तसेच फोनमध्ये एकावेळी अनेक ॲप्स सुरू असतील तर तेव्हाही चार्जिंग हळू होऊ शकते. तसेच फोनबरोबर देण्यात आलेला ओरिजिनल चार्जर वापरण्याचा सल्ला दिला जातो, कारण इतर चार्जर वापरल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते.
WhatsApp New Feature : व्हॉटसअॅपवर आले नवे ‘कॉल लिंक’ फीचर; कसे वापरायचे जाणून घ्या
गूगल प्ले स्टोअरची समस्या
काही फोनमध्ये गूगल प्ले स्टोअर व्यवस्थित चालत नाही, यामुळे कोणतेही नवे ॲप डाऊनलोड करताना खूप वेळ वाया जातो, किंवा इन्स्टॉलेशन मध्येच बंद पडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर सेटिंग्स मध्ये जाऊन मेमरी क्लीअर करू शकता किंवा ‘फोर्स स्टॉप’ पर्याय, किंवा कॅशे क्लीअर करण्याचा पर्याय निवडु शकता.
मोबाईल डेटा किंवा वायफाय कनेक्शनची समस्या
इंटरनेटशिवाय मोबाईलवर कोणतेही काम करता येत नाही. अशात जर सतत मोबाईल डेटा आणि वायफाय डिस्कनेक्ट होत असेल तर काय करावे जाणून घ्या. मोबाईलमध्ये वायफाय सतत डिस्कनेक्ट होत असेल तर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन फरगेट वायफाय पर्याय निवडून, पुन्हा वायफाय कनेक्ट करा. यामुळे जर वायफाय कनेक्ट झाला नाही तर कदाचित राउटर मध्ये काही समस्या असू शकते. तसेच मोबाईल डेटासंबंधी समस्या असल्यास एअरप्लेन मोड ऑन करुन काही सेकंदाने बंद करा, यामुळे मोबाईल डेटा कनेक्ट होईल.
ॲप्स सतत क्रॅश होणे
जर मोबाईलमध्ये ॲप्स क्रॅश होत असतील, तर सर्वात आधी त्या ॲपचे अपडेटेड वर्जन आहे का तपासा, तसे नसल्यास अपडेट पर्याय निवडा. यासह सेटिंगमध्ये त्या ॲप्स चा डेटा आणि कॅशे क्लीअर करण्याचा पर्याय निवडुन ॲप्स क्रॅश होण्यापासून थांबवू शकता.