भारत सरकारद्वारे ८ युट्युब चॅनेल्स बॅन करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ८ युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेल्सद्वारे राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोटी माहिती प्रसारित केली जात होती. ही माहिती लोकांपर्यंत पोहचून चुकीच्या माहितीचे अधिक प्रसारण होऊ नये, यासाठी भारत सरकारद्वारे हे चॅनेल बंद करण्यात आले आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा निर्णय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या निर्णयाबाबत सांगितले की, ‘माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल ८ युट्युब चॅनेल ब्लॉक केले आहेत. आयटी नियम २०२१ अंतर्गत हे युट्युब चॅनेल बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ७ भारतीय आणि एका पाकिस्तानी युट्यूब चॅनेलचा समावेश आहे. बॅन करण्यात आलेल्या युट्युब चॅनेल्सना ११ कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत, तर ८५ लाख ७३ हजार सब्सक्रायबर्स आहेत.’

आणखी वाचा – बारीक पीन, पातळ पीनच्या मोबाईल चार्जरची डोकेदुखी संपणार; मोदी सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत

हे आहेत ब्लॉक करण्यात आलेले ८ युट्युब चॅनेल्स

ब्लॉक करण्यात आलेल्या चॅनेल्समध्ये ‘लोकतंत्र टीवी’, ‘यू एंड वी टीवी’, ‘एएम रजवी’, ‘गौरवशाली पवन मिथिलांचल’, ‘सीटॉप 5टीएच’, ‘सरकार अपडेट’ आणि ‘सब कुछ देखो’ या भारतीय चॅनेल्सचा समावेश आहे. तर पाकिस्तानमधील ‘ न्यूज की दुनिया’ या युट्युब चॅनेलला बॅन करण्यात आले आहे. या चॅनेल्सपैकी काही व्हिडिओंमधील कंटेंट हा धार्मिक तेढ निर्माण करणारा होता असे स्पष्टीकरण भारत सरकारने दिले आहे. तसेच इतर व्हिडिओंमध्ये देशाविषयी खोटी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्या चॅनेल्सना बॅन करण्यात आले आहे.

Story img Loader