सध्या भारतामध्ये आंब्याचा हंगाम सुरु आहे. आंब्याचा हंगाम असताना भारतीय स्वतःला कसे काय आंबे खाण्यापासून अडवू शकणार आहेत. हापूस खाण्यासाठी लोक वर्षभर वाट बघत असतात. मात्र काही जणांना बाजारामध्ये जाऊन आंबे खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे लोकं फळांचा राजा असलेल्या आंब्याची ऑर्डर ही ऑनलाईन स्वरूपात करत आहेत. Zepto हे लोकप्रिय किराणा डिलिव्हरी करणारे अॅप आहे. झेप्टोने शेअर केलेल्या डेटानुसार, एप्रिल महिन्यामध्ये भारतीयांनी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचे आंबे ऑर्डर केले आहेत. म्हणजेच या अॅपला एकाच दिवशी ६० लाख रुपयांच्या आंब्याची ऑर्डर मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इतकेच नाही तर मे महिन्यामध्ये देखील यावरून आंब्याची ऑर्डर मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मे महिन्याच्या ऑर्डर्स एप्रिल महिन्यातील रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
Zepto ने शेअर केलेल्या माहितीनुसार, पिकलेल्या आंब्याप्रमाणे या ऑनलाईन स्टोअरवरून कच्चे आंबे देखील मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले गेले आहेत. ग्राहकांनी यावरून २५ लाख रुपयांचे कच्चे आंबे ऑर्डर केले आहेत. वर्षभर टिकणारे आंब्याचे लोणचे, कैरीचे पन्हे यासाठी कच्चे आंबे ऑर्डर करण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.
Meta मध्ये एका वर्षात चौथा राजीनामा; आता ‘या’ मोठ्या अधिकाऱ्याने कंपनीला रामराम ठोकला
हापूस आंबा जो आंब्यातील सगळ्यात महाग असणारा एक प्रकार आहे. मात्र झेप्टोवर या ऑनलाईन स्टोअरवरून हापूस आंबा सर्वात जास्त ऑर्डर करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या हापूस आंब्याने मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरणामधील आंबाप्रेमींची मने जिंकली आहेत. झेप्टोवरील एकूण आंब्याच्या विक्रीमध्ये ३० टक्के वाटा हा हापूस आंब्याचा आहे.
हापूसनंतर आंध्र प्रदेशमधील बैंगनपल्लीमधील आंब्याने या ऑनलाईन स्टोअरवरील विक्रीमध्ये २५ टक्के विक्रीची नोंद केली आहे. हा आंबा खास करून दक्षिणेकडील शहरांमध्ये लोकांच्या पसंतीस उतरला आहे. ताज्या आंब्याचा आमरस पर्याय हा देखील लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. झेप्टो देशातील १०० प्रतिभावान शेतकऱ्यांकडून आंबे विकत घेते. हापूस आंबा हा रत्नागिरी आणि देवगड येथून खरेदी केला जातो. केशर आंबा हा जालना, जुनागड , बदामी आंबा अनंतपूर , चित्तोड शहरांमधून खरेदी केला जातो. तोतापुरी आंब्यासाठी रामनगर आणि कृष्णगिरीसह अन्य शहरांचा समावेश आहे.