IRCTC Super App : भारतीय रेल्वेचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. कारण- रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी नवे सुपर ॲप लाँच करणार आहे, ज्यावर सध्या वेगाने काम सुरू आहे. हे ॲप लाँच झाल्यानंतर प्रवासाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. IRCTC च्या या नव्या ॲपमध्ये प्रवाशांना ट्रेनची स्थिती तपासणे, तिकीट बुकिंग करणे आणि त्यांच्या आवडीचे जेवण ऑर्डर करणे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरअखेरपर्यंत हे ॲप लाँच करण्याची तयारी सुरू आहे. जाणून घ्या सुपर ॲपमध्ये प्रवाशांना नक्की कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?
सुपर ॲप म्हणजे काय?
भारतीय रेल्वे (IRCTC) हे सुपर ॲप लाँच करणार आहे. त्यामध्ये रेल्वे प्रवासाशी संबंधित सर्व माहिती प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाईल. या ॲपचे डिझाईन रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने केले आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करणे, प्लॅटफॉर्म पास मिळवणे, ट्रेनचे वेळापत्रक व जेवण ऑर्डर करणे या सुविधादेखील मिळतील. या ॲपद्वारे प्रवाशांना संपूर्ण प्रवासाचा मागोवा घेता येणार आहे.
India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
ॲपमध्ये मिळणाऱ्या इतर सुविधा
आयआरसीटीसी सुपर ॲपद्वारे रेल्वे तिकीट आणि जेवण ऑर्डर करण्याशिवाय इतरही अनेक सुविधा उपलब्ध असतील. त्यामध्ये फ्लाइट बुकिंग, कॅब आणि हॉटेल बुकिंग ते आरक्षित तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट बुकिंग व टूर पॅकेज बुकिंगपर्यंत सर्व काही करता येईल. त्याशिवाय ई-कॅटरिंग, रिटायरिंग रूम व एक्झिक्युटिव्ह लाउंजसाठी बुकिंगची सुविधाही मिळू शकेल. आतापर्यंत प्रवाशांना रेल्वे प्रवासाशी संबंधित अपडेटसाठी अनेक ॲप्सचा वापर करावा लागत होता. उदाहरणार्थ- जेवण ऑर्डर करण्यासाछी IRCTC eCatering Food on Track याशिवाय IRCTC Rail Connect, UTS, Rail Madad अशा सर्व ॲप्सचा वापर करावा लागत होता.
IRCTC द्वारे आरक्षित तिकीट बुकिंगसाठी एक स्वतंत्र प्लॅटफॉर्मदेखील सुरू राहील. IRCTC आणि CRIS द्वारे प्रवाशांना ही सुविधा दिली जाणार आहे. वास्तविक रेल्वेला आपले महसुली उत्पन्न वाढवायचे आहे आणि या ॲपच्या मदतीने हेदेखील साध्य होईल, अशी व्यवस्थापनाला आशा आहे. या सुपर ॲपसंबंधित सर्व आवश्यक बाबींची प्रगती वा तयारी CRIS द्वारे केले जात आहे. डिसेंबर महिन्यातच हे ॲप आणले जाऊ शकते. कारण- त्यात सध्या अनेक सुधारणा केल्या जात आहेत आणि त्या पूर्ण झाल्यावर हे ॲप लाँच केले जाईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सुपर ॲपबद्दल सांगितले की, भारतीय रेल्वे प्रवासी सेंट्रिक ॲप विकसित करत आहे. प्रवासी या एकाच अॅपमधून अनारक्षित तिकिटेही बुक करू शकतील, तक्रारी नोंदवू शकतील, कोणत्या ट्रेन उपलब्ध आहेत हे जाणून घेऊ शकतील आणि इतर अनेक गोष्टी एकाच ॲपद्वारे साध्य करू शकतील.