India’s First National Space Day: गेल्यावर्षी ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आणि विक्रम लँडर २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरला होता. हा प्रत्येक भारतीयांसाठी एक खास दिवस होता, म्हणूनच दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ (National Space Day) साजरा होईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. त्यामुळे भारत आज २३ ऑगस्ट २०२४ रोजी पहिला-वहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे. तसेच चंद्रावर लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणाला शिव-शक्ती पॉइंट म्हटले जाते; त्यामुळे हा दिवस या खास गोष्टीसाठीसुद्धा ओळखला जातो आहे.
या वर्षी राष्ट्रीय अंतराळ दिनाची थीम “टचिंग लाईव्हज व्हेली सेंट रेट टचिंग द मून: इंडियाज स्पेस सागा” अशी ठेवली आहे. या खास दिनानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हा सोहळा आयोजित केला जात आहे आणि हा कार्यक्रम इस्रोच्या वेबसाइट, यूट्यूब चॅनेलवर तुम्ही लाईव्हदेखील पाहू शकता. या सोहळ्यात इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याबद्दल कौतुक केले. सोमनाथ यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अलीकडील धोरणात्मक सुधारणा, उपक्रमांवरदेखील प्रकाश टाकला आहे.
हेही वाचा…वर्क फ्रॉम होम करताय? तुमच्यासाठी BSNL चा ‘हा’ रिचार्ज ठरेल बेस्ट? किंमत किती ? जाणून घ्या
स्पेस ऑन व्हील्स :
‘राष्ट्रीय अंतराळ दिना’निमित्त (National Space Day) भारत मंडपम येथे दोन दिवसीय भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे; ज्यामध्ये हायप्रोफाइल सेशन्स, परस्परसंवादी प्रदर्शने, भारताच्या अंतराळ यशासंबंधी महत्त्वाच्या घोषणा आदींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त “स्पेस ऑन व्हील्स” नावाचे मोबाइल प्रदर्शन देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना भेट देतील. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना इस्रोच्या उपक्रमांबद्दल, भारताच्या अग्रगण्य अंतराळ मोहिमांबद्दल शिक्षित करणे असा असणार आहे.
‘नॅशनल स्पेस डे’मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषादेखील समाविष्ट असणार आहेत; ज्यामध्ये “पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता आहे?” यासारखे प्रश्न विचारले जातील. अंतराळ विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वारस्य वाढवण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करते आहे. ‘नॅशनल स्पेस डे’ (National Space Day)साजरे करणे हे अंतराळ संशोधनातील भारताच्या उल्लेखनीय प्रगतीचा, भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचा पुरावा आहे. या दिवसासाठी नियोजित कार्यक्रम, सामाजिक फायद्यासाठी उपक्रम आणि मानवी ज्ञानाची प्रगती करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी राष्ट्राचे समर्पण अधोरेखित करतात.