Infosys Co-Founder Nandan Nilekani on Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वेगाने विकसित होत आहे. माणसाची अनेक कामे एआयच्या मदतीने चुटकीसरशी होऊ लागली आहेत. त्यामुळी येत्या काही वर्षांत एआयमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, अशी भिती सर्वांनाच सतावतेय. दरम्यान, इन्फोसिसचे सह-संस्थापक व चेअरमन नंदन निलेकणी यांनी एआयबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य करून लोकांमधील एआयची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. “एआय कितीही उपयुक्त असलं तरी अनेक मानवी गुणांना पर्याय नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “सहानुभूती, नेतृत्व, सहकार्य व सर्जनशीलता हे मानवी गुण नेहमीच महत्त्वाचे राहतील. एआय या गुणांची जागा घेऊ शकत नाही. एआय जगात कितीही विकसित झालं तरी पाच जणांना एकत्र करून काम पूर्ण करता येत नसेल तर एआय मानवावर मात करू शकणार नाही”.
नंदन निलेकणी म्हणाले, “लोकांनी अशा क्षमतांकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या काळ पुढे सरकला तरी त्या तशाच राहिल्या पाहिजेत आणि त्या एआयमुळे प्रभावित होऊ नयेत. फर्स्ट-प्रिन्सिपल थिंकिंग हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. एआय हे मेकॅनिकल विचारावर आधारित आहे. परंतु, एआयमध्ये मूलभूतपणे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याची आणि ते समजून घेण्याची क्षमता नाही”. मनी कंट्रोलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान, निलेकणी यांनी मान्य केलं आहे की एआयमुळे काही लोकांच्या नोकऱ्या जातील. अनेक क्षेत्रांमधील रोजगाराच्या संधी कमी होतील. अनेक कामं ऑटोमेटेड होतील. परंतु, या बदलाकडे आपण सकारात्मकपणे पाहायला हवं असंही त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले, “नक्कीच काही नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होईल. काही कामं स्वयंचलित होतील. फार कमी क्षेत्रांमधील नोकऱ्या पूर्णपणे नष्ट होतील. एआय मानवाची उत्पादकता वाढवेल त्याचप्रमाणे काही नव्या संधी निर्माण करेल. आपण ज्याचा विचारही केला नसेल अशा काही नोकऱ्या एआयमुळे निर्माण होतील”.
केंद्र सरकारने ‘इंडिया एआय मिशन’ हाती घेतलं आहे
भारतातील एआयच्या विकासाबाबत निलेकणी म्हणाले, “येत्या काळात यामध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. भारत सरकार देखील एआयकडे गांभीर्याने पाहत आहे. आपल्या सरकारने ‘इंडिया एआय मिशन’ हाती घेतलं आहे. त्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात अनेक महत्त्वाचे एआय मॉडेल पाहायला मिळतील. भारताची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती व डिजीटल क्रांती एआयच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यास मदत करेल.
एआय मानवाची जागा घेऊ शकत नाही : नंदन निलेकणी
निलेकणी म्हणाले, “सध्याच्या घडीला एआय प्रत्येक क्षेत्रात आपले हातपाय पसरत आहे. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासह मानवी क्षमतांचा विकास करणं आवश्यक आहे. एआय मानवाची जागा घेऊ शकत नाही. उलट एआय मानवाला अधिक सक्षम बनवेल यात शंका नाही”.